लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाने सगळ्यांचेच आर्थिक गणित गेल्या दीड - दोन वर्षांपासून बिघडविले आहे. तशातच महागाईचा भस्मासुर वाढू लागल्याने सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला वाढू लागल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. १ सप्टेंबर रोजी पुन्हा २५ रुपयांनी घरगुती गॅस महागला असल्याने आता फ्लॅटमध्येच चुली पेटवायच्या का, असा त्रस्त प्रश्न गृहिणींच्या मनात उमटू लागला आहे.
ऐन कोरोना काळात महागाई वाढल्याने सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडू लागले आहेत. कोरोनाने सगळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असतानाच महागाई वाढल्याने जनता त्रस्त झाली आहे. ऐन कोरोना काळात घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दामदुप्पट वाढू लागले आहेत. त्यामुळे आता घरगुती गॅस वापरणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. गेल्या वर्षभरात घरगुती गॅसचे दर २९० रुपयांनी वाढले आहेत.
सबसिडी किती भेटते हो भाऊ?
- पूर्वी घरगुती गॅसवर अनुदान दिले जायचे. थेट बँक खात्यावर हे अनुदान जमा व्हायचे.
- ऐन कोरोना काळात हे अनुदानही शासनाने बंद केले आहे. त्यामुळे आता वाढलेल्या दराने गॅस सिलिंडर घ्यावा लागत आहे.
- गेल्या दीड वर्षात गॅसवरील अनुदानही बंद आणि दराचा आलेख मात्र चढता असल्याने गृहिणींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
.....................
व्यावसायिक सिलिंडरही महाग
घरगुती गॅस सिलिंडरबरोबरच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही प्रत्येक महिन्याला वाढू लागल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये घरगुती सिलिंडरची किंमत ६०५ रुपये होती, तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत १३११ रुपये होती. गेल्या नऊ महिन्यांत घरगुती गॅस २९० रुपयांनी, तर व्यावसायिक गॅस तब्बल ३६८ रुपयांनी महाग झाला आहे.
............................
महिन्याचे गणित कोलमडले
कोरोनाने आर्थिक नुकसान केले असतानाच गेल्या वर्षभरात घरगुती गॅसचे दरही वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांत तर सिलिंडर १०० रुपयांनी महागला आहे. अजूनही ही दरवाढ होत आहे. त्यामुळे आता यापुढे सिलिंडर वापरणे कसे परवडणार, ही चिंता लागून राहिली आहे.
- प्रियांका साळवी, रत्नागिरी.
घरगुती गॅसची परत दरवाढ झाली आहे. आधीच अडचणींचा डोंगर आहे. त्यातच तर मूलभूत गरजांच्या किमती वाढल्या तर करायचे काय? घरचे बजेट कोरोनाने कोलमडले आहे. त्यातच आता गॅसचे दर वाढू लागल्याने दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, हाच मोठा प्रश्न आहे.
- सुखदा सारोळकर, रत्नागिरी.