रत्नागिरी : जयगड - निवळी या दुपदरी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे प्रत्यक्षात ४२ कोटींचे आहे. त्यामुळे माजी आमदार बाळ माने यांनी ८० कोटींचा आकडा आणला कुठून असा सवाल करत, त्यांनी आधी माहिती करून घ्यावे व नंतर बोलावे. तसेच सात कंपन्यांमधील आर. डी. सामंत कंपनीची सर्वात कमी रकमेची निविदा स्वीकारली गेली. माने यांनी शिफारस केलेल्या कंपनीची निविदा स्वीकारली न गेल्यानेच कदाचित ते दुखावले असावेत, असा टोला आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला.रत्नागिरी तालुक्यातील जयगड - निवळी रस्ता हा चौपदरी होणार होता. त्याबाबत राज्य शासनाशी आधी करारही झाला होता. परंतु, आता जयगड येथील कंपनीने चौपदरीकरणाला नकार का दिला व दुपदरीकरणाच्या कामाला शासनाने मान्यता कशी दिली हे माने यांनीच त्यांच्या वरिष्ठांना विचारावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.उद्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही आर. डी. सामंत कंपनीला मिळाले तर तेही मॅनेज करून मागच्या दाराने मिळवले असा आरोप बाळ माने करणार काय? असा सवालही सामंत यांनी केला. (प्रतिनिधी)मुळात दुपदरीकरणाचा निर्णय का झाला याचे उत्तर जयगड येथील त्या कंपनीकडून व शासनाकडून माने यांनी घ्यावे. हा रस्ता चौपदरी करण्याची माने यांची मागणी असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी साकडे घालावे. परंतु, चौपदरीकरणामुळे बाजारपेठा उदध्वस्त होतील, अनेक घरे हटवावी लागतील. हे करणे योग्य आहे का? असा सवाल आता माने यांनाच जनतेने विचारावा, असेही सामंत म्हणाले.
कोटींचा आकडा आणला कुठून : सामंत
By admin | Updated: November 23, 2015 00:32 IST