शिवाजी गोरे - दापोली ,देशभरात स्वच्छ भारत मोहीम जोरदार सुरु आहे. या मोहिमेला सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. दापोली नगरपंचायतीने स्वच्छ भारत मिशन शहरात प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. दापोली नगरपंचायतीला स्वच्छ भारत मिशन हागणदारीमुक्तचा सन्मान मिळाला आहे. मात्र, असे असले तरीही काही ठिकाणी स्वच्छ भारत मोहिमेला गालबोट लागल्याच्या घटना घडत असून, नवानगर पऱ्याशेजारील पाच कुटुंबाच्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याची तक्रार तानाजी पोवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे दापोली नगरपंचायतीच्या स्वच्छ भारत मोहिमेला गालबोट लागण्याची शक्यता आहे.दापोली नगरपंचायत हद्दीतील जोगळे-नवानगर सरकारी झोपडपट्टी पुनर्वसन वसाहतीतील १० शौचालयांच्या आऊटलेटचे अशुद्ध पाणी थेट ओढ्यात सोडल्याने ओढ्यातील पाणी अशुद्ध होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच यामुळे ओढ्याशेजारी असणाऱ्या जालगाव ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मीनगरमधील पाच विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या कुटुंबियांवर विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. ओढ्यातील पाणी अशुद्ध झाल्याने आजुबाजूच्या विहिरींचे पाणीदेखील दूषित झाले आहे.विहिरींमध्ये ओढ्यातील अशुद्ध तसेच शौचालयाचे दूषित पाणी याचा निचरा होत असल्याने सदर विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे विहीर आहे, मुबलक पाणीसुद्धा आहे. परंतु, विहिरीचे पाणी दूषित झाल्याने ते पिण्यायोग्य नाही. गेली अनेक महिने विकतचे पाणी पिण्याची वेळ या कुटुंबांवर आली आहे. त्याचबरोबर नवानगर वसाहतीतील संडासच्या टाकीसाठी करण्यात आलेल्या खोदकामातील दगड व माती ओढ्यात टाकण्यात आल्याने या ओढ्याचा प्रवाह बदलून वाहणारे पाणी एकाच ठिकाणी साठले आहे. ओढ्यातील पाण्यात शौचालयाचे पाणी थेट सोडण्यात आल्याने ओढ्यातील या पाण्यावर डासांचा प्रादूर्भाव होऊन ओढ्याशेजारील कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवानगर वसाहतीतील लोक कचऱ्याची विल्हेवाट न लावता थेट ओढ्यात आणून टाकत असल्याने ओढ्यात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, परिसरात दूर्गंधी पसरल्याची तक्रार तानाजी पोवार यांनी केली आहे.
नवानगरच्या पाच विहिरींचे पाणी दूषित
By admin | Updated: December 24, 2015 00:57 IST