रत्नागिरी : गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावली आहे. दिवसभरात ३१६.२० मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण तालुक्यात घर व गोठ्याचे नुकसान वगळता अन्य तालुक्यात नुकसानाची नोंद झालेली नाही. मात्र, जिल्ह्यात १३ व १४ सप्टेंबर राेजी काेकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रविवारी सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आहे. दुपारी काही वेळ विश्रांती घेतली असली तरी सरीवर पाऊस कोसळत होता. त्यामुळे सायंकाळी गाैरी आणण्यासाठी जाणाऱ्या महिलांना भिजतच जावे लागले. मंडणगड तालुक्यात ४०.२०, दापोली ४६.४०, खेड ५४.४०, गुहागर २९.८०, चिपळूण ४०.८०, संगमेश्वर २७.७०, रत्नागिरी १६.१०, लांजा २६.१० तर राजापूर तालुक्यात ३४.७० मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१७७०.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात झाला आहे. चिपळूण तालुक्यातील माैजे कोसळी येथे राजेंद्र सावंत यांच्या घराचे तर माैजे कटरे येथील राजाराम जाधव यांच्या गोठ्याचेही नुकसान झाले आहे.