चिपळूण : भजन, कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज आज देशोधडीला लागला आहे. कलावंत आणि त्यांची कुटुंब उपासमारीचा सामना करीत आहेत. वारकरी समाजाला जगवण्याचे काम करण्यासाठी कलावंत निधीचा सन्मान मिळवून देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारकरी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात वारकरी समाजाने आपल्या भावनांचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना दिले.
कोरोनामुळे गत दीड दोन वर्षे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम बंद आहेत, तर मंदिरे ही बंद असल्याने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे समाज प्रबोधन करणारा वारकरी समाज बेरोजगारीच्या खाईत लोटला गेला आहे. भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून कीर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, गायनाचार्य, मृदंगमनी असे सारे एकमेकांवर अवलंबून आहेत. मात्र, कोविडच्या नियमामुळे हे सर्व कार्यक्रम बंद आहेत. गावोगावी अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र, दीड दोन वर्षे हे कार्यक्रम बंद झाल्याने वारकरी समाज आणि त्याच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने कलावंतांसाठी मानधन सुरू केले आहे.
वारकरी समाजाचा कलावंत म्हणून सन्मान करावा आणि त्यांनाही मानधन मिळावे, अशा मागणीचे निवेदन चिपळूण तालुकाध्यक्ष शांताराम नवेले, चिपळूण तालुका सचिव राजेंद्र राजेशिर्के, बळीराम चाळके, दीपक साळवी, विश्वंभर चिले, चंद्रकांत पिळधनकर, प्रथमेश सावंत, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर मादगे, अनंत चव्हाण, मंगेश महाडिक, सुरेश बोलाडे, बारकू जावळे, प्रकाश कदम, दत्ताराम आयरे, आदीनाथ खापरे आदींनी तहसीलदार सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.