चिपळूण : शहरातील न्यायालयासमोरुन एस. टी. बस स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावरून अवजड वाहने हाकण्यास बंदी आहे. तसेच हा मार्ग एकेरी असूनही सर्वच प्रकारची वाहने ये-जा करत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. न्यायालयाकडून शहरातील मुख्य बसस्थानकाकडे येणारा हा रस्ता जुना आहे. यापूर्वी या रस्त्यावर जड वाहनास बंदी असल्याचा फलक लावण्यात आला होता. मात्र, सध्या हा फलकही येथून गायब झाला आहे. शिवाजी चौक ते पॉवर हाऊस हा मुख्य रस्ता अवजड वाहनांसाठी असताना काही वेळा या एकेरी मार्गावरुन वाहनांची ये-जा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडे संबंधित यंत्रणाही डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे. अवजड वाहतूक असलेला मार्ग मुख्य मुंबई-गोवा महामार्गाला मिळत असून, जवळच तहसील कार्यालय, पोलीस ठाणे त्याचप्रमाणे सध्या महिला विद्यालय आहे. एकेरी वाहतुकीसाठी असणाऱ्या या मार्गावरुन सध्या अन्य वाहनेही धावत आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या अस्तित्त्वास धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेले फलकही येथून गायब झाले आहेत. त्यामुळे नवीन वाहतूक करणाऱ्यांना हा एकेरी मार्ग असल्याची कल्पना येत नाही. नगर परिषद प्रशासन व वाहतूक पोलीस यांनी या एकेरी मार्गावरुन वाहतूक करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.चिपळूण शहरातून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे बंधन असताना या मार्गावर अवजड वाहने फिरत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. बाहेरुन येणाऱ्या गाड्यांचा वेग व रस्त्यावर असणारी रहदारी लक्षात घेता हा मार्ग अशा वाहनांना बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. (वार्ताहर)नियम कडक करावेतन्यायालयाकडून एस. टी. स्टँडकडे येणाऱ्या मार्गावर अवजड वाहने फिरत असल्याने वाहतुकीला हा मार्ग धोकादायक झाला आहे. या ठिकाणचे फलकही गायब झाल्याने नागरिकांनाही या मार्गाने येणे जिकरीचे झाले आहे. नगरपरिषदेने मार्गावरील फलक पुन्हा लावून अवजड वाहतुकीबाबतचे नियम कडक करावेत, अशी मागणी होत आहे.
चिपळुणात एकेरी मार्गाचे उल्लंघन
By admin | Updated: December 5, 2014 23:29 IST