दस्तुरी : गावोगावी भटकंती करून रस्त्याच्या कडेचा आधार घेत झोपडी, कच्चे घर तसेच पालामध्ये राहुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीचे शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी कमीत कमी सहा महिने वास्तव्यास असलेल्या लाभार्थी कुटुंबाला ५ गुंठे जमीन देऊन त्यावर २६९ चौरसफुटाचे घर बांधून देण्यात येणार आहे.याबाबतचे आदेश जिल्ह्यातील तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना दिले आहेत. त्यामुळे या कुटुंबांना हक्काचे घर मिळणार असून, उदरनिर्वाहासाठी वर्षानुवर्षे होणारी वणवण थांबणार आहे.विमुक्त जाती व भटक्या जमातींमध्ये प्रामुख्याने वडार, बेलदार, लमाणी, धनगर, घोरपी आदींचा समावेश येतो. हा बहुतांश समाज आजही बेघर असून, मिळेल ते काम करत आपली उपजीविका करत आहे. या समाजापैकी विशेषत: वडार व बेलदार समाजाचा दगडफोडी हाच एकमेव उत्पन्नाचा मार्ग होता. मात्र, आधुनिकतेच्या युगात क्रशरच्या माध्यमातून हव्या त्या आकाराची खडी तयार मिळत असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच या समाजाचे राहणीमान सुधारावे, उत्पन्न वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे.लाभार्थींना जमीन व घरासह उर्वरित जमिनीवर लाभार्थी कुटुुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामसेवक याबाबतचे सर्वेक्षण करुन शासन निकषाप्रमाणे जी कुटुंब लाभ घेण्यास पात्र आहेत, त्यांची परिपूर्ण माहिती गोळा करुन अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थी कुटुंबाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, जात, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, वार्षिक उत्पन्न, राहणीमान यासह इतर माहितीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.विमुक्त जाती व भटक्या जमातीतील बहुतांश ग्रामस्थांचे वास्तव्य खेड तालुक्यातील भरणे, सुकिवली, चिंचघर - दस्तुरी, भडगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येते. (वार्ताहर)मुक्त वसाहत योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण करण्यात येणार.एकाच ठिकाणी कमीत कमी सहा महिने वास्तव्य असणे आवश्यक.लाभार्थी कुटुंबाला ५ गुंठे जमीन देऊन त्यावर २६९ चौरसफुटाचे घर बांधून देण्याची योजना.
विमुक्त जाती, भटक्या जमातींचे सर्वेक्षण
By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST