रत्नागिरी : समुद्रातून फिशींग करुन घरी परतणाऱ्या होडीला (बलाव) लाटांचा तडाखा बसून झालेल्या अपघातात चार खलाशी बुडाले. दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. दरम्यान होडीचे व जाळ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.गावखडी - पूर्णगड खाडी मुखाशी सकाळी ६ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. गावडे - आंबेरे येथील मच्छीमार सुरेश दामोदर सारंग हे मच्छीमारी करुन घरी परतत असताना त्यांच्या होडीला लाटांचा तडाखा बसला. संदीप दामोदर सारंग हा खलाशी बलावावरुन उडून समुद्रात पडला. त्याला वाचविण्यासाठी सुरेश सारंग, अनिल सारंग, दशरथ लाकडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. शेवटी बलावही बुडाले. संदीप सारंग पोहत गावखडीच्या दिशेने गेला त्याला स्थानिक मच्छीमार अशोक तोडणकर यांनी वाचविले. याबरोबरच राजेश आंबेरकर, जनार्दन सारंग, संजय सारंग, उमेश आडविरकर, प्रल्हाद हरचकर यांनी समुद्रात उड्या घेऊन तिघांचे प्राण वाचविले. गावखडी सुरुबन ते बलावापर्यंत समुद्रातून हे सर्व पोहत गेले. त्यानंतर मिलींद पावसकर यांची पावस यथून लाँच बोलावण्यात आली. गावडे आंबेरेचे बाबल्या नाटेकर, नीलेश डोर्लेकर, पुरुषोत्तम आडविरकर, पूर्णगडचे नुरु बंदरकर, गावखडीचे जगदीप तोडणकर यांनी चारीबाजूंनी होड्यांची मदत लावल्याने बुडालेले बलाव गावडे - आंबेरे येथे ओढून आणले. इंजिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून केबीनही मोडली. अर्धी जाळी समुद्रात बुडाली, मासेही पाण्यात बुडाले. ‘महालक्ष्मी प्रसाद’ असे या बलावाचे नाव आहे. (प्रतिनिधी)
गावखडीत बलाव बुडाले, खलाशी बचावले
By admin | Updated: September 6, 2015 23:18 IST