मेहरुन नाकाडे - रत्नागिरी गावातील तंटे गावात मिटवण्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी तंटामुक्त समित्यांकडे सोपवली आहे. या अभियानात सहभागी झालेल्या समित्या आपापली जबाबदारी चोख बजावत असल्याचे दिसून येत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तप्त असले तरी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावातील शांतता अबाधित राहावी, यासाठी तंटामक्त समित्या खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे.प्रलंबित तंट्यांचे प्रमाण व नव्याने निर्माण होणारे तंटे याचा विचार करता दुसरीकडे निकाली निघणाऱ्या तंट्यांचे प्रमाण अल्प आहे. तसेच गावातील शांतता अबाधित राहावी. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सामोपचाराने अंतर्गत वादविवादाचा निवाडा करावा व एकोपा राखावा, हाच मूळ उद्देश होता. अभियान राबविण्यात आल्यापासून राज्यात सुमारे १५ लाखांहून अधिक तंटे परस्पर सामोपचाराने मिटले. सुमारे १६ हजारांच्या आसपास गावे तंटामुक्त झाली आहेत. अभियानात प्रतिबंधात्मक उपायांची अंलबजावणी हा महत्वाचा भाग आहे. शासनाने एकूण दहा प्रकार निश्चित केले आहेत. त्यामध्ये उत्सव शांततेत व पोलीस बंदोबस्ताशिवाय साजरे करणे, जातीय व धार्मिक सलोखा राखणे, सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण होऊ न देणे, ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करणे, अवैध धंद्याचा बंदोबस्त, व्यसनमुक्ती, अनिष्ट प्रथा मोडीत काढणे, हुंडाबळी, सामाजिक सुरक्षा, राजकीय सामंजस्य, वैयक्तिक उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांना समाविष्ट करण्यात आले आहे. गावातील शांततेला धोका निर्माण होऊ नये, शिवाय तंटे उद्भवू नयेत, यासाठी तंटामुक्त समित्या कार्यरत आहेत. सध्या निवडणुकामुळे राजकीय वातावरण तप्त आहे. विविध पक्षांची मंडळी आपापला प्रचार करीत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सभा, कोपरा सभा यांचे आयोजन करीत आहे. परंतु गावातील तंटामुक्त समित्यांमुळे आतापर्यंत वातावरणील शांतता कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेला प्राधान्य देत तंटामुक्त समित्यांना शासनाने अधिकार दिल्यानेच वादविवादाच्या क्षणी वेळीच हस्तक्षेप करून समितीच्या सदस्यांनी निवडणूक कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि वादविरहीत कसा पार पडेल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणुकांचा कार्यक्रम शांततेत पार पाडावा, यासाठी समित्याही आपापल्या पातळीवर खबरदारी घेत आहेत. गावातील वाद मिटवून गावची प्रतिमा उंचावणे, या उदेशाने गावोगावच्या समित्या कार्यरत आहेत.
गाव शांतता हेच तंटामुक्त समित्यांचे यश
By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST