रत्नागिरी : काेराेनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही अनेकजण गाडी घेऊन अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या लाेकांवर वाहतूक पाेलीस विभागाने कडक पावले उचलून वाहनेच जप्त करण्याची माेहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी शहरात तब्बल २५ वाहने जप्त करून पाेलीस मुख्यालयातील मैदानावर आणून ठेवण्यात आली आहेत.
गेले काही दिवस सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या कालावधीत कोरोना अनुषंगाने कोणतेही नियम न पाळता भाजीपाला व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत होती. रत्नागिरी शहर व चिपळूण शहर येथील बाजारपेठेत सकाळी ११ वाजल्यानंतर मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानंतरही लोकांची व वाहनांची गर्दी होत आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच बाहेर पडण्याची मुभा असतानाही अगदी क्षुल्लक कारणासाठी लोक वाहनासह मोठ्या प्रमाणावर बाहेर येत येत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी व चिपळूण येथील बाजारपेठेत तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा वाहतूक शाखा व पोलीस स्थानकाला दिले आहेत. तसेच आवश्यक कारणांसाठी बाहेर पडलेल्या लोकांकडूनही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यांच्यावरही कारवाईचे आदेश दिले आहेत.
या अनुषंगाने ९ मे २०२१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ८८६ वाहनांवर, तर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या ३८५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी शहरात अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरणाऱ्या वाहन चालकांकडील एकूण २५ वाहने जिल्हा वाहतूक शाखेकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. ती लाॅकडाऊन संपल्यानंतरच संबंधितांना परत केली जाणार आहेत.
--------------------------
कायद्यानुसार कारवाई - ८८६ वाहने - ३,१९,६०० रुपये दंड
विना हेल्मेट - ३८५ वाहने - १,९२,५०० रुपये दंड
--------------------------
काेराेनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांच्या आराेग्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहतूक शाखेची कारवाई सुरूच राहणार आहे. घरात राहा, सुरक्षित राहा.
- शिरीष सासणे, पाेलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी