श्रावणी भालेकर हिला सुवर्ण पदक
चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय रिकव्हर आर्चरी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी-सती विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी शिरीष भालेकर हिने १४ वर्षे वयोगटात सुवर्ण पदक प्राप्त केले. विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट डेरवण स्पोर्ट्स ॲकॅडमीमार्फत ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रावणी भालेकर हिला प्रशिक्षक ओंकार घाडगे व डेरवण स्पोर्ट ॲकॅडमीचे मार्गदर्शन लाभले.
कालभैरव देवस्थानचा शिमगोत्सव
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील ग्रामदैवत श्री देव नवा कालभैरव देवस्थानचा शिमगोत्सव साधेपणात साजरा केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून रविवारी रात्रीपासून या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ग्रामदैवताच्या दोन्ही पालख्या मंदिरातून बाहेर काढून सहाणेवर ठेवण्यात आल्या आहेत. तेथे पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी व अन्य कार्यक्रम होणार आहेत.
दापोलीचा पारा ४० अंशांवर
दापोली : दापोलीवासीय हे गेले तीन-चार दिवस उन्हाच्या झळांनी त्रस्त झाले असून दापोलीचा पारा ४० अंशांवर गेल्याने दापोलीकरांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळले असल्याचे दिसत आहे. गेले तीन-चार दिवस दापोलीतील किमान तापमानात वाढ होत आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दापोलीचे कमाल तापमान ४०.७ अंशांवर गेले होते.
श्रद्धा जाबरे यांची निवड
चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक श्रद्धा सुनील जाबरे यांची शासनाकडून उत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शासनाकडून २०१९-२० च्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक श्रद्धा जाबरे यांची पहिल्या क्रमांकासाठी निवड करण्यात आली. द्वितीय क्रमांकासाठी मंडणगड येथील प्रभा जाधव आणि तृतीय क्रमांकासाठी दाभोळच्या उल्का तोडणकर यांची निवड केली आहे.
विजेने उजळला अंजनवेल फाटा
गुहागर : आरजीपीपीएलच्या वतीने वीजनिर्मितीद्वारे देशाच्या उन्नतीमध्ये आपला हातभार देण्याबरोबरच प्रकल्पाच्या परिसरातील गावांसाठी तसेच आजूबाजूच्या लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम हे नेहमीच राबविले जात असतात. याच अंतर्गत काही दिवसांपूर्वी आरजीपीपीएलच्या वतीने अंजनवेल फाटा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व या वेळी परिसरात लाइटची व्यवस्था नसल्याने आरजीपीपीएलच्या वतीने या ठिकाणी लाइटची व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार अंजनवेल फाटा परिसर उजळवून टाकला आहे.
ग्राहक दिन साजरा
चिपळूण : संजीवनी डीएमएलटी नर्सिंग कॉलेज व लायन्स क्लबतर्फे जागतिक ग्राहक दिन संजीवनी प्रशिक्षण संस्थेत साजरा झाला. या वेळी पटवर्धन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाघुळदे, संध्याराणी नांदगावकर, निखिता झगडे, आदिती पटवर्धन उपस्थित होते.
लोटे येथे मनसे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून खेड तालुका अध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके यांच्या संकल्पनेतून व पक्षाच्या वतीने लोटे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यानिमित्ताने लोटे घाणेखुंट येथील परशुराम रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या वेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विश्वास मुधोळे, कामगार सरचिटणीस संदीप फडकले आदी उपस्थित होते.
चिपळूण नगर परिषदेची आज विशेष सभा
चिपळूण : महाविकास आघाडीने २७ कामांसाठी केलेल्या मागणीनुसार ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता नगर परिषदेची विशेष सभा होणार आहे. या सभेत गॅस पाइपलाइनवर निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोनासह अनेक कारणांमुळे गेल्या वर्षभरापासून विकासाची कामे रखडली आहेत. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्र देऊन विशेष सभेची मागणी केली होती.
मुस्लीम विकास मंचतर्फे सामूहिक विवाह सोहळा
चिपळूण : तालुका मुस्लीम विकास मंचची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. या मंचतर्फे चिपळुणात डिसेंबर महिन्यात सामूहिक विवाह सोहळा घेण्याची संकल्पना अध्यक्ष अन्वर पेचकर राबवणार आहेत. या दृष्टीने मंचच्या तयारीला वेग आला आहे.