असुर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावातील भुवडवाडीमध्ये अनसुठाचा विधी कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार काका जोयशी यांचे सहकारी विलास डिके यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मकांड विरहित फोटो पूजनाने मंगळवारी संपन्न झाला.
सावर्डे गावामध्ये सामाजिक परिवर्तन संदर्भात पहिली सभा गुरूवार, दि. २६ ऑगस्ट, २०२१ रोजी गुडेकरवाडी व दुसरी सभा गुरूवार, दि. २ सप्टेंबर, २०२१ रोजी भुवडवाडीमध्ये कोकणचे गाडगेबाबा काका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. याचे फलित म्हणून शनिवार, दि. १८ सप्टेंबर २०२१ रोजी तीन सम्राट बळीराजाच्या पूजा झाल्या. याच्या पुढे एक पाऊल टाकत सावर्डेवासीयांनी कर्मकांडाला महत्त्व न देता समाजहित जोपासत तीन अनसुठ विधी फोटो पूजनाने करून नवा पायंडा रचला. यामध्ये शुभम शांताराम भुवड, सागर नामदेव भुवड आणि गंगाबाई गोविंद वाघे यांचे अनसुठ विधी सर्व कर्मकांडाला तिलांजली देत करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भुवड, विजय भुवड, रघुनाथ भुवड, सुरेश भुवड, धोंडू खसासे, सखाराम वाघे, बाबू भुवड, गंगाराम वाघे, अशोक भुवड, सुनील वरेकर यांचे योगदान मोलाचे ठरले. तसेच गावातील गावकरी मंडळी, महिला, तरुण व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते. विलास डिके यांनी अनिष्ट रुढी-परंपरासंदर्भात मार्गदर्शन तसेच ओबीसी जनगणनेचे महत्त्व समजावून सांगितले. जर २०२१ च्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसेल तर गावकऱ्यांनी जनगणनेस सहकार्य करू नये, असे आवाहनही केले व शासनास जनगणनेबाबतच्या असहकार्याचा संदेश म्हणून सर्वांनी आपआपल्या घराच्या दर्शनीय भागात आमची गणना नाही, तर जनगणनेस आमचे सहकार्य नाही. अशा निषेधाच्या पाट्या लावाव्यात अशी सूचना केली.
220921\img-20210921-wa0033.jpg
अवास्तव खर्च टाळून व कर्मकांडाविरहित पितृपक्षातील श्राद्ध केवळ फोटो पुजानाने केलेले सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थ.