संकेत गाेयथळे / गुहागर : गुहागर शहरातील तांबडवाडी येथे राहणाऱ्या रवींद्र मालप यांनी माडांच्या पात्यांंपासून विणलेली अनोखी टोपी सध्या शहरात आकर्षण ठरत आहे.
रवींद्र मालप हे गुहागर शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या स्कूलमध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहेत. पूर्वीपासूनच वेगळे काही तरी करण्याची आवड त्यांच्यात होती. यातूनच आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुहागर शहरातील पहिला जादूचे प्रयोग करणारा जादूगार म्हणून ओळख निर्माण केली होती. पुढे काळानुसार जादुगिरी हा विषय पाटी पडला. गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या स्कूलमध्ये शिपाई या पदावर रुजू झाले तरीही त्यांच्यामधील कलाकार स्वस्थ बसू देत नव्हता. तालुक्यात अनेक पर्यटक येतात, त्यांना गुहागरची अशी वेगळी वस्तू नेता आली पाहिजे, अशी संकल्पना मालप यांच्या डोक्यात घोळू लागली. यातूनच गुहागरी नारळ झाडांपासून काहीतरी वेगळे निर्माण करावे, असा मनात ध्यास घेतला. नारळाच्या पात्यांपासून टोपी करण्यासाठी विविध माध्यमांवर माहिती घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला टोपी बनविताना अडचणी आल्या. परंतु सातत्याने प्रयत्न केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची अनोखी टोपी बनविण्यास त्यांना यश आले. गुहागर शहरात जेव्हा मालप टोपी घालून फिरतात तेव्हा सर्वांच्या नजरा ही टोपी खेचून घेते. अनेकांनी मालप यांना अशी टोपी बनवून देण्याच्या ऑर्डरही देण्यास सुरुवात केली आहे.
---------------------------
गुहागर शहरात तालुक्यात माडाची झाडे खूप असल्याने माडाच्या झावळीपासून झाप तयार केले जातात अशाच पद्धतीने काही वेगळी वस्तू निर्माण करता येऊ शकतात का? तसेच गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी वेगळे देण्याच्या उद्देशाने गुहागरी वस्तूंपासून अशा प्रकारचे वेगळी टोपी तयार केली आहे. भविष्यात जेव्हा पर्यटन सुस्थितीत सुरु होईल तेव्हा अशा टोप्या व याच बरोबर अन्य काही वस्तू हस्त कलेतून बनवून गुहागरची वेगळी ओळख निर्माण करण्याचा आपला मानस आहे.
- रवींद्र मालप
-----------------------
केवळ माडाच्या बारा पात्या
ही टोपी बनविण्यासाठी केवळ माडाच्या बारा पात्या (पाने) लागतात. सुरुवातीला या पात्या ओल्या असल्याने टोपी हिरवी दिसते. त्यानंतर पात्या सुकल्यानंतर टोपीचा थोडाफार रंग बदलतो. अनेक महिने ही टोपी चांगली राहते. नैसर्गिक रंगाचा या टोपीबरोबरच याला वेगवेगळे रंग देऊन ग्राहकाच्या आवडीनुसार रंगीबेरंगी टोपी टोप्या करता येऊ शकतात.