चिपळूण : तालुक्यातील कापसाळ येथील गाव समितीच्या महिलांनी नुकतीच आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली. विविध बचत गटांच्या माध्यमातून महिला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे पाहून त्यांनी या महिलांचे कौतुक केले आणि त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी गावातच उद्योग भवन इमारत उभारून देण्याचे आश्वासनही दिले.
कापसाळ गावामध्ये मुंबई-गोवा महामार्गालगत जिल्हा परिषद शाळेची एक इमारत होती. परंतु, पटसंख्येअभावी ती शाळा बंद पडली आणि सध्या ही जागा मोकळी आहे. त्या ठिकाणी गावातील बचतगट, ग्रामसंघ यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या महिलांना हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध व्हावे, अशा प्रकारचे उद्योग भवन उभारून द्यावे, या मागणीसाठी गावातील एकता महिला गाव समितीच्या महिलांनी नुकतीच जाधव यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली.
यावेळी आमदार जाधव यांनी या महिलांशी संवाद साधला. गावात ५३ बचत गटांच्या माध्यमातून ४००हून अधिक महिला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करताना, आपण एक चांगली मागणी घेऊन माझ्याकडे आला आहात. आपल्या सर्वांमध्ये निर्माण झालेल्या उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन आपल्याला अधिक सक्षम बनवणे, हे आमदार म्हणून माझे कर्तव्यच आहे, असे सांगून कितीही अडचणी आल्या, तरी त्यावर मार्ग काढेन व उपलब्ध असलेल्या जागी उद्योग भवन इमारत उभी करून देईन, असा शब्द त्यांनी समितीच्या महिलांना दिला. यावेळी एकता महिला गाव समितीच्या अध्यक्ष स्वाती साळवी, उपाध्यक्ष मंजूषा साळवी, सचिव भूमी खेडेकर यांच्यासह समितीच्या सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.