जैतापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असताना विकासापासून वंचित राहिलेल्या याच गावातील दोन घरांना दिवसातून दोनदा पाण्याचा वेढा पडतो आणि गावाशी संपर्क तुटतो. खाडीच्या पाण्याचा वेढा दरदिवशी पडत असताना जीव मुठीत धरून जीवन जगणारे हे कुटुंबिय विकासाच्या प्रवाहात येणार तरी कधी? लोकप्रतिनीधींच्या संवेदना बोथट झाल्या आहेत.अनेक वर्षांपासून जैतापुरातील पीरवाडी येथील जयवंती श्रीधर गोठणकर आणि प्रभाकर गोठणकर या कुटुंबियांचे वास्तव्य असलेल्या घरांच्या सभोवती चारही बाजूनी खाडीचे पाणी भरते. घराच्या सभोवती (चिपी) तिवराची झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. दिवसातून दोनदा येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा वेढा या घराना पडतो आणि थेट संपर्क तुटतो. आपल्या दैनंदिन कामांसाठी किंवा मुलांना शाळेत यायचे असेल तर भरतीच्या वेळा बघूनच बाहेर पडावे लागते नाहीतर पाण्यातूनच वाट काढण्याशिवाय पर्याय नाही.दरदिवशी या घरातील माणसांना गावात येण्यासाठी खाडीतलाच मार्ग आहे. चिपीच्या झाडांमधून मार्ग काढीत आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी बाजारात यावे लागते. या कुटुंबियांची अवस्था दयनीय असून, जयवंती गोठणकर याना सन २०११/१२मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने घरकुल मिळाले आहे. मात्र, घरापर्यंत जाण्यासाठी मार्गच नाही.कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी काही जनावरे पाळली असून, त्यांनाही अनेकवेळा पाण्यातूनच बाहेर आणावे लागते. त्यांचा चारा-पाणीही बाहेरून आणवा लागतो, यासाठी कसरत नेहमीचाच भाग झाला आहे.अत्यंत गरीबीत जीवन जगणाऱ्या जयवंती गोठणकर यांचे सहा माणसांचे कुटुंब आहे. गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोठणकर यांचे वय ७५ वर्षे आहे. दोन मुलगे, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. खाडीच्या पाण्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलाना होणारा त्रास, आजारपणात उपचारासाठी जाताना होणारा त्रास सहन करीत जीवन जगत असलेल्या कुटुंबियांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक डोळेझाक तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गोठणकर कुटुंबियांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी ही बाब येथील ज्येष्ठ ग्रामस्थ भास्कर मांजरेकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांपासून पालकमंत्र्यापर्यंत सर्वांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न लेखी निवेदनांद्वारे केला आहे. (वार्ताहर)
दररोज दिवसातून दोन वेळा पाण्याच्या वेढ्यामध्ये...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 01:04 IST