रत्नागिरी : धनाच्या लालसेपोटी तालुक्यातील मेर्वी येथे एक महिन्यापूर्वी झालेल्या नितीन अभ्यंकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी संदेश शामराव शिंगाडे (वय २८, शाहूनगर, हातकणंगले, कोल्हापूर) आणि प्रदीप तात्यासाहेब खोत (कागल, कोल्हापूर) या आणखी दोन संशयितांना आज, शनिवारी अटक केली़ हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून, त्यांना न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ या दोघांच्या अटकेमुळे आरोपींची संख्या नऊ झाली आहे.१४ डिसेंबर २0१३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तीन वाहनांतून आलेले नऊ ते दहाजण जबरदस्तीने अभ्यंकर यांच्या घरात घुसले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासकामी आलो आहोत़ तुम्ही त्या आरोपींना आसरा दिला असल्याचे सांगत या नऊ-दहाजणांनी अभ्यंकर यांच्या घराची झडती घेतली होती. देवघरही त्यातून सुटले नाही. अभ्यंकर कुटुंबीयांनी त्याला विरोध करताच नितीन अभ्यंकर यांना मारहाण करण्यात आली. तसेच कुटुंबीयांना मारण्याची धमकीही त्यांनी दिल्याची तक्रार पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली होती़ पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास चालू आहे़ धनाच्या लालसेपोटी झालेल्या या हल्ल्याची पाळेमुळे खोलवर पोहोचली असून, पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेला शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख पुंडलिक जाधव याच्यासह सातजणांना यापूर्वीच अटक केली होती़ या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून, आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे़ (शहर वार्ताहर)
गुप्तधन प्रकरणात आणखी दोघांना अटक
By admin | Updated: January 18, 2015 00:37 IST