रत्नागिरी : शहरातील १२ ठिकाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्याठिकाणी न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या सर्व सूचना व मजकूर असलेले फलक प्रदर्शित केले जाणार आहेत. यासाठी येणाऱ्या ६१५६९ रुपये खर्चालाही आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. शहरातील या १२ शांतता क्षेत्रांमध्ये देसाई हायस्कूल, गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, जीजीपीएस, फाटक प्रशाला, परशुरामपंत अभ्यंकर प्रशाला, स्वस्तिक हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, न्यायालय, परकार हॉस्पिटल, लोटलीकर हॉस्पिटल, नगरपरिषद शाळा क्र. २ (लोकमान्य टिळक प्रशाला) यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगररोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेला २०१०-११ तसेच २०१२-१३ या आर्थिक वर्षअखेर मंजूर झालेल्या कामांपैकी जी कामे झाली नाहीत त्याचे अखर्चित ४२ लाख १६ हजार १४८ निधी जिल्हाधिकाऱ्यांना परत करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)पाणी वितरणाचे चित्र विदारक...शहरातील अंतर्गत जलवाहिन्या अत्यंत खराब झाल्या आहेत. या जलवाहिन्या लोकवर्गणीतून काही नागरिकांनी खरेदी केल्या आहेत. मात्र, त्या बसवून देण्यास पाणी विभागाचे कर्मचारी नकार देत असल्याचा मुद्दा नगरसेविका शिल्पा देसाई यांनी उपस्थित केला. नागरिक पाईप खरेदी करतात. ते जोडून देण्याचीही पालिकेची तयारी नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचे नगरसेवक बंड्या साळवी यांनी सांगितले. या विषयावरूनही नगराध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपल्यापर्यंत संबंधित नगरसेवकांनी हा विषयच आणला नसल्याचे सांगितले. मात्र, या विषयामुळे अंतर्गत जलवाहिन्यांची स्थिती किती विदारक आहे व पालिका या गंभीर विषयाबाबत किती उदासीन आहे, हेच स्पष्ट झाल्याचा टोलाही लगावण्यात आला.
रत्नागिरीत बारा ठिकाणे शांतता क्षेत्र जाहीर
By admin | Updated: December 2, 2015 00:41 IST