लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या निक्षय योजनेचा जिल्ह्यातील ५४४ क्षयरोगी रुग्णांना लाभ मिळताे. या योजनेतून क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देण्याबरोबरच सकस पोषण आहारही देण्यात येतो.
जिल्ह्यात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आढळत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या मागे १६० ते २०० क्षयरोगी असतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याचे या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तरीही शासनाच्या आरोग्य विभागाकडून यावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचे निदान करून या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जे क्षयरुग्ण उपचार घेत आहेत त्यांना निक्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येतात. या रुग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळत असली तरी रुग्णांना औषधोपचारसह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो.
----------------------------------
टीबीची लक्षणे काय?
रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी हाणे आदी टीबीची लक्षणे दिसून आल्यास वेळीच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.
-------------------
जास्तीत जास्त २० महिन्यांत टीबीमुक्त
n टीबीच्या रुग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रुग्ण ६ महिन्यांत पूर्णपणे बरा होऊ शकतो.
n एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागतो.
-------------------
क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३ टक्के
रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्के आहे. एखाद्या रुग्ग्णाचा बँक डिटेल्स नसल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र, जास्तीत जास्त क्षयरोग रुग्णांना शासनाच्या निक्षय योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
-डॉ. श्रीकांत देसाई, जिल्हा क्षयराेग अधिकारी