चिपळूण : जिल्ह्यात विविध २४ गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेला अट्टल गुन्हेगार साहील काळसेकर याने आज (सोमवारी) सायंकाळी चिपळूण न्यायालयात जोरदार हंगामा करून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एखाद्या चित्रपटातील प्रसंग शोभावा, अशी घटना आज न्यायालयात घडली. पोलिसांनी सतर्कता दाखवत पाठलाग करून काळसेकरला पुन्हा पकडले.चिपळूण तालुक्यातील शिरळबन येथे शनिवारी सकाळी दिलावर काद्री यांच्या मारुती-८०० कारची काच व हेडलाईट फोडल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्याच रात्री काद्री हे आपला कामधंदा आटोपून घरी परतले असता वाटेत दबा धरून बसलेल्या साहील काळसेकरने त्यांचा पाठलाग केला व चाकूने हल्ला केला. ठार मारण्याची धमकी दिली. प्रसंगावधान राखून काद्री यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर काद्री यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेवून अटक केली. आज दुपारी काळसेकर याला न्यायालयात हजर केले असता पोलिसांबरोबर तो बसला होता. अधूनमधून तो गोंगाट करत होता. मध्येच उठून त्याने थेट न्यायाधिशांच्या डायसवर चढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या प्रकारामुळे सर्व कर्मचारी व वकील भयभीत झाले. परंतु, पोलिसांनी त्याला बाहेर आणले. काही वेळाने पोलिसांची नजर चुकवून काळसेकर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. संरक्षक भिंतीवरून उडी मारण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला. त्याचवेळी सचिन तांदळे, योगेश नागवेकर व बच्छाव या पोलीस कर्मचाऱ्यांनी झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. या हल्ल्याने न्यायाधिशांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना पाचारण केले. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर न्यायालयात दाखल झाले. काळसेकरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)चिपळूण न्यायालयाच्या आवारातून अट्टल गुन्हेगार साहिल काळसेकर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचारी सचिन तांदळे, योगेश नागवेकर, बच्छाव आदींनी झडप घालून त्याला पकडले. काळसेकरवर विविध २४ गुन्हे दाखलसाहील काळसेकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय खुनाचा प्रयत्न, न्यायाधीश बाफना यांच्या अंगावर चप्पल फेकणे, शिरळ येथील शैलेश मोरे यांच्या घरात घरफोडी करणे व आता काद्री यांच्यावर चाकू हल्ला हे गुन्हेही दाखल आहेत. सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे २ व खुनाचा १ गुन्हा दाखल आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चोरीचे ५, तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १ व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संगमेश्वर पोलीसात चोरीचे ३ गुन्हे दाखल आहेत. देवरुख व गुहागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी १ चोरीचा गुन्हा दाखल आहे. विविध २४ गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. न्यायालयातून साहील काळसेकरने पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व त्यांचे सर्व सहकारी न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. न्यायालयाच्या आवाराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. साहिल काळसेकर याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे व दहशतीमुळे शिरळ, कोंढे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साहिल याच्यामुळे या भागात कोणताही तणाव निर्माण होऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गुंडाचा कोर्टातून पलायनाचा प्रयत्न
By admin | Updated: January 6, 2015 01:20 IST