चिपळूण : येथील व्यापारी व त्रिमूर्ती हॉटलचे मालक राजेंद्र दाभोळकर यांच्याबरोबरच राजू मिरगल व लक्ष्मी भूरण यांचे निधन झाल्याने खेर्डी गावावर शोककळा पसरली आहे. खेर्डी बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. खेर्डी येथील त्रिमूर्ती हॉटेलचे मालक राजेंद्र काशिनाथ दाभोळकर (४७) हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात आघाडीवर होते. २००० साली झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत कोंढे पंचायत गणातून ते पराभूत झाले होते. गेले काही दिवस ते आजारी होते. शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. आज शनिवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत अनेक मान्यवर सहभागी झाले होते. खेर्डी येथील लक्ष्मी दत्ताराम भुरण (७४) या शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता वाशिष्ठी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. अचानक वाढलेल्या पाण्यातून त्या वाहत गेल्या. आज शनिवारी सकाळी ९ पूर्वी एन्रॉन पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा पुतण्या विनोद जयवंत भुरण यांनी पोलीस ठाण्यात खबर दिल्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दाभोळकर, मिरगल, भुरण यांच्या मृत्यूने खेर्डीवर शोककळा पसरली. गेली ३० वर्षे या तिघांनीही खेर्डीच्या सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रात कामगिरी बजावली होती. खेर्डीवर आलेल्या प्रत्येक संकटात या मंडळींनी भाग घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. महापूराच्या संकटात यांनी अनेकांना वाचविले होते.खेर्डी येथील लेबर कॉन्ट्रॅक्टर व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र श्यामराव मिरगल (३६) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावरही आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्यावर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)
तिघांच्या मृत्यूने शोककळा
By admin | Updated: August 17, 2014 00:40 IST