रत्नागिरी : कोरोनामुळे फटका बसलेल्या एस. टी.ची प्रवासी वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्यात येणार आहे. आर्थिक तोटा सहन करणाऱ्या एस. टी. मंडळाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता पूर्ण क्षमतेने एस. टी. बस सुरु होणार असल्याने प्रवाशांकडूनही स्वागत करण्यात येत आहे.
मासेमारीला सुरुवात
दापोली : दरवर्षी १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होत असली तरी वादळ व पावसाळी वातावरणामुळे यावर्षीही मासेमारीचा मुहूर्त लांबला. काही मच्छिमारांनी समुद्राचा अंदाज घेऊन गेल्या दोन दिवसांपासून मासेमारीला सुरुवात केली आहे. हर्णै बंदर मासळी खरेदी-विक्रीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे बंदर आहे. ८०० ते ९०० नौका या बंदरात मासळी उतरतात. मासेमारीला सुरुवात झाल्यामुळे पुन्हा हर्णै बंदर गजबजताना दिसत आहे.
रानभाजी महोत्सव
देवरुख : देवरुख पंचायत समितीमध्ये रानभाजी महोत्सव पार पडला. तालुक्यातील शेतकरी, महाराष्ट्र जीवनज्योती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी रानभाजी नमुने व त्यांच्या पाककृती प्रदर्शनात सादर केल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन सभापती जयसिंग माने यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर उपस्थित होते. या प्रदर्शनाला महिला बचतगट व शेतकऱ्यांचीही चांगली उपस्थिती होती.
जागतिक खारफुटी दिन
रत्नागिरी : गोगटे - जोगळेकर महाविद्यालय आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक खारफुटी दिनानिमित्त काेल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या डाॅ. निरंजना चव्हाण यांचे ‘खारफुटी वने आणि मानवाची सुरक्षितता’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात खारफुटीचे महत्त्व, त्याची उपयुक्तता याची माहिती देण्यात आली.
मदतीचा हात
खेड : महाराष्ट पोलीस बाॅईज संघटनेने महाड, खेड, चिपळूण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष रितेश गोसावी, उपाध्यक्ष दर्पण जाधव, सचिव लोकेश राणे, सरचिटणीस अविनाश कांबळे, अरबाज सय्यद, प्रशांत दळवी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आदर्श शिक्षक पुरस्कार
दापोली : तालुक्यातील मुरुड येथील एन. के. वराडकर हायस्कूलचे उपशिक्षक राजेश नरवणकर यांना संस्थेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गाैरविले. यावेळी संस्थाध्यक्ष सुहासिनी मोरे, सचिव संजय भावे, विश्वस्त रमेश तळवटकर तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा मिरवणकर यांनी केले.