मंडणगड : मागासलेला म्हणून प्रशासकीय पातळीवर नेहमीच दुर्लक्षित असलेल्या मंडणगड तालुक्यातील पर्यटनस्थळांचा जिल्हा नियोजन समितीने यात्रास्थळांच्या विकास निधीसाठी विचारच न केल्याने तालुक्यातील ही पर्यटनस्थळे दुर्लक्षित राहणार आहेत.जिल्हा परिषदेत तालुक्याचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषदेचे तीनही सदस्य आपल्या तालुक्याचे प्रश्न मांडण्यात कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेल्या आंबडवे या तालुक्यातील गावाचा क वर्ग पर्यटनस्थळासह आदर्श संसद ग्राम योजनेत नुकताच समावेश करण्यात आला आहे. बाणकोट येथील किल्ले हिंमतगडचा राज्य शासनाने ड वर्ग पर्यटनस्थळात नुकताच समावेश केला आहे. याचबरोबर सांस्कृतिक कार्य विभागाने या किल्ल्याची राज्य संरक्षित स्मारक म्हणूनही घोषणा केली आहे. नाना फडणवीसांचे मूळ गाव वेळास हे सागरी कासव संवर्धन मोहीमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. पर्यटकांना आठवड्याची सुटी मजेत घालवण्यासाठी वेळास हे ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरत आहे.राज्य व देशपातळीवर दखल घेतलेल्या तालुक्यातील तीनपैकी एकाही गावाचा जिल्ह्यातील महत्त्वाच्या ८१ यात्रास्थळांमध्ये समावेश न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.यंदा यात्रास्थळांच्या विकासासाठी १ कोटी ४० लाखांचा तरतूद जिल्हा नियोजनमधून करण्यात आली आहे. राज्य शासनाचे धोरण पर्यटन विकासाला अनुकूल असून, जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा म्हणून विकास करण्यासाठी विशेष आग्रही आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जिल्हास्तरावर राबवण्यात आलेला पर्यटन महोत्सव तालुकास्तरावर नेऊन अधिक लोकाभिमुख करण्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी यापूर्वीच केली आहे.जागतिकस्तरावर दखल घेतल्या गेलेल्या तालुक्यातील तीन बलस्थानांचा संबंधितांना विसरच कसा पडला, हा प्रश्न आहे. जिल्हा नियोजनमधून जिल्ह्यासाठी करण्यात आलेली तरतूद अत्यंत तूटपुंजी असल्याच्या तक्रारीचा सुरु जिल्हाभरातून येत आहे. या पार्श्वभूमीवर मंडणगडसारख्या उत्तरेच्या टोकाकडील तालुक्याचा विसरच पडल्याने मंडणगड तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींची कार्यपध्दती नकारात्मक असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. (प्रतिनिधी)
पर्यटनस्थळांचा विसर
By admin | Updated: July 29, 2015 22:07 IST