खेड : तालुक्यातील कशेडी लिटीचीवाडी येथील एका घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३,८२,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी तीन संशयितावर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ जून राेजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी सई संतोष दरेकर (३५, रा. गुप्ता चाळ रुम नं. ५ जमीलनगर, भांडुप) यांनी फिर्याद दिली आहे़ या फिर्यादीनुसार समीर रघुनाथ दरेकर (रा. डोंबिवली ठाणे), अर्चना प्रमोद चव्हाण व शुभम प्रमोद चव्हाण (दोन्ही रा. कळवा, ठाणे) यांच्याविरोधात येथील पोलीस स्थानकात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप-मुंबई येथे राहणाऱ्या व मूळ कशेडी लिटीचीवाडी येथील सई संतोष दरेकर यांचे तालुक्यातील कशेडी लिटीचीवाडी येथे घर आहे. या घरातील बंद कपाटाचे लॉकर तोडून रोख रक्कम दीड लाख रुपये व एक लाख रुपये किमतीच्या पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, ७५ हजार रुपये किमतीची तीन तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, ३७,५०० रुपयाची दीड तोळ्याची सोन्याची माळ, १२,५०० रुपयाची दोन कानातली फुले व ७,५०० रुपयाच्या तीन सोन्याच्या छोट्या अंगठ्या असा एकूण ३ लाख ८२ हजार ५०० रुपयाचा ऐवज चाेरीला गेला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वैशाली आडकूर करीत आहेत.
--