आवाशी : लोटे परशुराम (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीत ३५ वर्षे कंपनी चालवणाऱ्या कंपनी मालकाने त्याच्याच महिला कामगाराशी असभ्य वर्तन करून तिला धमकावत कंपनीबाहेर हाकलण्यात आले. ही घटना गुरुवार, १२ रोजी दुपारी पावणेतीन वाजता घडली. मात्र, पोलीस असोसिएशनचे अध्यक्ष, लोटे ग्रामपंचायत कमिटी व कंपनीने यावर सामोपचाराना तोडगा काढत पडदा टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे हा वाद तेथेच मिटवण्यात आला.गेली पस्तीस वर्षे एक मराठी उद्योजक कारखाना चालवत आहे. त्यांनी येथील स्थानिकाना प्राधान्य देत पॅकिंगच्या कामासाठी महिलावर्गाचा भरणा केला. आठ महिला व पाच पुरुषांच्या मदतीने त्यांनी हा कारखाना आजवर जिवंत ठेवला आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या महिला व्यवस्थापकांना आजच्या कामाचे वेळापत्रक दिले. त्याप्रमाणे दुपारपर्यंत काम सुरळीत सुरु होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कंपनीचे मालक कंपनीत हजर झाले व त्यांनी दिलेल्या कामकाजाप्रमाणे काम होत नसल्याचे पाहताच त्यांचा पारा चढला. तेथे काम करणाऱ्या सातपैकी एका महिलेला याबाबत जाब विचारला. ज्या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले नसल्याने ते काम राहिले, असा तिने खुलासा केला. मात्र, तिचे काहीही न ऐकता अर्वाच्य भाषेत बोलत मालक तिच्या अंगावर धावू गेला. तू तत्काळ कंपनीबाहेर हो, असे फर्मावले. तुम्हाला जायचे असेल तर तुम्हीही चालत्या व्हा, असे तिच्या शेजारी उभ्या असणाऱ्या उर्वरित महिलांनाही त्यांनी सुनावले. आपला व आपल्या सहकाऱ्यांचा काहीच दोष नसताना कंपनी मालकाने आपणाला अशी असभ्य वागणूक का द्यावी, या विचारात आठही जणी कंपनीबाहेर पडल्या. त्यांनी ही बाब लोटे ग्रामपंचायतीला कळवून थेट लोटे पोलीस दूरक्षेत्र गाठले. तेथे उपस्थित असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. एम. जाधव यांचेकडे लेखी फिर्याद दिली.मात्र, तोपर्यंत लोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रेया चाळके, उपसरपंच रवींद्र गोवळकर, सदस्य सचिन चाळके, भाजपचे खेड तालुका युवकचे अध्यक्ष विनोद चाळके, इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, पद्मा प्लास्टिक कंपनीचे मालक मिलिंद बारटक्के व लोटे, चिरणी, सोनगाव येथील ग्रामस्थ, पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर कंपनी मालकाला पोलीस स्थानकात बोलावण्यात आले. या सर्वांच्या मध्यस्थीने यावर यशस्वी तोडगा काढला. (वार्ताहर)
महिला कर्मचाऱ्यांना धमकावले
By admin | Updated: November 13, 2015 23:45 IST