रत्नागिरी : आंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले जोडणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सात शिक्षकांवर कारवाई रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पोलीसांनी मूळ कागदपत्रांची मागणी केल्याने कारवाईस उशीर होत असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले असले तरी यामध्ये आर्थिक साटेलोटे असल्याची चर्चा शिक्षकवर्गात सुरु आहे. शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीसाठीच्या प्रस्तावासाठी जिल्हा परिषदेतील काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी हात धुऊन घेतले. हजारो रुपये आंतर जिल्हा बदलीसाठी प्रस्ताव करणाऱ्या शिक्षकांकडून उकळले गेले. मात्र, शासनाने आंतरजिल्हा बदलीला स्थगिती दिल्याने त्या शिक्षकांवर डोक्याला हात लावण्याची पाळी आली आहे.आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव केलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदाराचा दाखला खोटा जोडण्यात आल्याचे सांगली जिल्हा परिषदेने उघडकीस आणले. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सात शिक्षक असल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये शिक्षक- शिवाजी कोयनाप्पा करवर, चंद्रकांत दत्तात्रय कोरबू, रेवाप्पा सर्जेराव खोत, शिक्षिका- कविता दत्तात्रय आंबी, सुशिला सुर्याबा सलगर, आरती वसंत चव्हाण व आशाताई तानाजी मंडळे यांचा समावेश आहे. या शिक्षकांनी बदली मागताना आपल्या जोडीदाराचा जोडलेला दाखला हा खोटा असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यावरील कारवाईबाबत चर्चांना ऊत आला आहे. खोटे दाखले जोडून या शिक्षकांनी प्रशासनाची फसवणुक केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याची दखल मुख्यकार्यकारी अधिकारी पे्ररणा देशभ्रतार यांनी दखल घेतली. त्यानंतर त्या शिक्षकांवर त्या-त्या तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याबाबत त्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट हे शिक्षक तो मी नव्हेच, अशा भूमिकेत वावरत आहेत. या शिक्षकांवरील कारवाईबाबत शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर याच्याशी संपर्क साधलो असता त्यांनी पोलीसांनी कारवाई करण्यास नकार दिला. त्यासाठी पोलीसांनी मूळ कागदपत्रांची मागणी केली. मूळ कागदपत्र सादर केल्यावरच त्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलीसांकडून सांगण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी स्पष्ट केले.अलाहाबाद पदवी धारण केलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अभय देण्यात आले. त्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीसाठी खोटे दाखले देणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्यास वेळकाढू पणाचे धोरण अवलंबिले जात आहे. त्यासाठी काही राजकीय पुढारी पुढे सरसावले असून यामध्ये लाखोंची आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा सध्या शिक्षकवर्गामध्ये सुरु आहे. (शहर वार्ताहर)वादग्रस्त अधिकाऱ्याला बक्षिसशिक्षण विभागाकडून वादग्रस्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची बक्षीस देण्याची परंपरा यापुढेही सुरुच राहणार आहे. रत्नागिरीचे तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनिल पाटील वादग्रस्त ठरले होते. त्यांची चौकशीही झाली होती. मात्र, ही चौकशी अधिकाऱ्यांनी गुंडाळली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याच वादग्रस्त विस्तार अधिकारी पाटील यांच्याकडे संगमेश्वर तालुक्याच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. हे सर्व काही जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा आशिर्वादाने चालत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
‘त्या’ शिक्षकांवरील फौजदारी रखडणार!
By admin | Updated: June 1, 2015 00:18 IST