मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पर्ससीन मासेमारीचा धुमाकूळ थांबता थांबत नसून गोवा, गुजरात व कर्नाटक राज्यातील पर्ससीन अतिक्रमणानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीनचे अतिक्रमण जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अगदी दहा वावच्या आत बेदरकारपणे सुरु झाले आहे. नेहमीच सायंकाळनंतर रात्रभर या पर्ससीनचा धुमाकूळ सुरु असतो. तरीही मत्स्य विभाग कारवाईस असमर्थ ठरतो. मंगळवारी रात्री पारंपरिक मच्छिमारांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. तहसीलदार यांच्या आदेशानुसार रात्री दहा वाजता मत्स्य विभागाची गस्ती नौका कारवाईस बाहेर पडली. गस्ती नौकेच्या हाती काहीही लागले नव्हते. मात्र, आज बुधवारी सायंकाळनंतर मोठ्या संख्येने पर्ससीन मालवण किनारपट्टीवर दाखल होत हैदोस घालत होते. मात्र, गस्ती नौका बंदच होती. याबाबत मच्छिमारांनी आयुक्तांशी संपर्क साधला व कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मालवण समुद्रात किल्ले सिंधुदुर्गनजीक मंगळवारी सायंकाळी उशिरापासून १० वाव खोल समुद्राच्या आत पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणारे अनेक ट्रॉलर्स दिसून आले. मात्र, गस्ती नौका किनाऱ्यावर दिसून आल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता रात्री त्यांनी समुद्रात जाण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर मच्छिमारांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधला व लक्ष घालून कारवाईची मागणी केली. मत्स्य अधिकारी कारवाईस बाहेर पडत नाहीत तोपर्यंत बाबू आचरेकर, महेश कोयंडे, महेंद्र पराडकर आदि मच्छिमारांनी बंदर जेटी येथे ठाण मांडले. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशाने मत्स्य अधिकाऱ्यांची रात्री १० वाजता गस्त सुरु होती. (प्रतिनिधी)आंदोलनाचा इशारा तीन पर्ससीन ट्रॉलर्सला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, रत्नागिरीचे हे पर्ससीन १० वाव खोल समुद्रात असले तरीही परवानाधारक असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आज सायंकाळीही पर्ससीन मच्छिमारांचा धुडगूस सुरु झाला. मात्र, गस्ती नौका किनाऱ्यावरच होती. त्याबाबत कारवाईसाठी थेट मत्स्य आयुक्तांशीही संपर्क साधण्यात आला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती.
पर्ससीनचा धुमाकूळ थांबता थांबेना
By admin | Updated: September 24, 2015 00:13 IST