लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी जिल्हाभरातून इच्छुक उमेदवार पुढे येऊ लागले आहेत. यामध्ये उत्तर रत्नागिरीतील काही इच्छुकही सरसावले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यावेळी हे पद उत्तर रत्नागिरीतच राहणार की दक्षिण रत्नागिरीकडे जाणार, हेच पाहायचे आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर भोसले यांनी काही महिनेच काम केले. मात्र, या पदावर काम करत असतानाच त्यांचे अचानक निधन झाले. त्यानंतर आजतागायत हे पद रिक्त आहे. अतिवृष्टी व महापुराच्या परिस्थितीमुळे या पदावर नव्याने नियुक्ती झाली नाही. मात्र, आता पुन्हा एकदा या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये काही हालचाली होताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकण दौरा करून येथील पूरपरिस्थितीचा व नुकसानाचा अंदाज घेतला. यावेळी त्यांनी काही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संघटना बांधणीविषयी चर्चा केली. त्याचवेळी जिल्हाध्यक्ष पदाविषयी प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याचे पुढे येत आहे.
तूर्तास या पदासाठी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, संगमेश्वरचे अशोक जाधव, अविनाश लाड, खेडचे आनंद जाधव आदींची नावे इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षपद पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आतापर्यंत जिल्हाध्यक्ष पदाचा मान रत्नागिरी, चिपळूण व खेडला मिळाला आहे. यावेळी पक्ष नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
--------------------
काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद अनेक दिवस रिक्त आहे. त्यामुळे या पदाची नियुक्ती येत्या पंधरा दिवसात केली जाणार आहे. मुळात एक जिल्हाध्यक्षपद व दोन कार्याध्यक्ष निवडले जाणार असल्याने उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी अशी विभागणी केली जाणार आहे. कारण मंडणगडपासून लांजापर्यंत जिल्हा विस्तारलेला असल्याने पक्षाकडून हा निर्णय घेतला जाणार आहे. या पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
- भाई जगताप, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष