फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील ४३ गावांमधील १ हजार ९४० ग्रामस्थांना आपत्तीचा धोका संभवत असून, त्यादृष्टीने महसूल विभागाने आपत्ती आराखडा बनवून या ग्रामस्थांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे या कुटुंबांचा धोका तात्पुरता टळला आहे.पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संगमेश्वर तहसील आपत्ती विभाग यंत्रणा सज्ज झाली असून, त्यानुसार आपत्ती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्याचा विस्तीर्ण भाग डोंगराळ आहे. तालुक्याच्या प्रत्येक भागात नदी, नाले आहेत. त्यामुळे पुराचा मोठ्या प्रमाणात धोका असतो. याच प्रमाणात दरडी कोसळणे व इतर आपत्तीमुळे जीवितास धोका उद्भवण्याची भीती असते. आपत्तीमध्ये या ग्रामस्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी तहसील कार्यालयाने दरडग्रस्त, पूरग्रस्त भागातील गावे, घरे, कुटुंबसंख्या, लोकसंख्या यांची माहिती संकलीत केली आहे.कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास स्थलांतरासाठी जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. आपत्तीग्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसतिगृह, समाजमंदिर, ग्रामपंचायत सभागृह, बुद्धविहार अशा ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत. दरडग्रस्त तसेच पूरग्रस्त गावांमध्ये माभळे, नावडी, रामपेठ, कसबा, कुरूधुंडा खुर्द, कोळंबे, वांद्री, फुणगूस, कोंड्ये, डिंगणी कुरंग, कोंड्रण, कोंडगाव, भडकंबा, कातळवाडी, खालची बाजारपेठ, वाळतेकरवाडी, किरबेट भागातील धनगरवाडी, देवळे माहीलवाडी, धुमकवाडी, वाणीवाडी, वाडी आधिष्टी, ओझरे बुद्रुकमधील बौद्धवाडी, हातीमवाडी, गुरववाडी, वरचीआळी, खडीकोळवणमधील रिंगणवाडी, खाडेवाडी, आंगवली भेरेवाडी, धावरेवाडी, निवे खुर्दमधील बौद्धवाडी, चर्मकारवाडी, सावंतवाडी, गुरववाडी, बौद्धवाडी, धनगरवाडी, देवरुख दत्तमंदिर, शिक्षक कॉलनी, ओझरे खुर्दमधील कुळ्येवाडी, तळवडेतर्फ देवरूख बडदवाडी, राववाडी यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
संगमेश्वरात दोन हजार ग्रामस्थांना धोका
By admin | Updated: July 5, 2016 00:33 IST