शिरगाव : अलोरे (ता. चिपळूण) ग्रामपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाल्याने जुनी इमारत पाडून इमारतीच्या सामानाचा लिलाव करण्यात आला. मात्र, लिलाव घेणाऱ्याने सामान नेण्यापूर्वीच ते गायब झाले आहे. दि. ३ जून रोजी इमारतीचे साहित्य कौले, जांभा दगड, लाकूड, दगडी तोड याचा लिलाव ग्रामपंचायतीने केला. ग्रामस्थ राजेंद्र शशिकांत सुर्वे यांनी लिलावात रितसर पावती करुन लिलाव घेतला. मात्र, ताब्यात घेण्यापूर्वीच सामान चोरीस गेले. याबाबत सरपंच प्रकाश मोहिते यांना लेखी पत्र दिले तरी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. ग्रामसेवकांकडे चौकशी करता सरपंच आणि तुम्ही मिटवून घ्या, असे त्यांनी सांगितले. अखेर अलोरे - देऊळवाडी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी गणेश पिंपळे यांना पत्र देऊन याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. हे सामान ५ हजार रुपये किमतीचे असून, ग्रामपंचायत अलोरे यांनी ५०हून अधिक ग्रामस्थांच्या तक्रार अर्जावर कोणती कार्यवाही झाली, याची माहिती ग्रामसेवक काळे यांच्याकडे घेत असता सरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्र बसायला हवे, असे उत्तर दिले. ५ हजार रुपयांच्या साहित्याची तत्काळ चोरी करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
अलोरे येथे ग्रामपंचायत साहित्याची चोरी
By admin | Updated: July 11, 2014 00:34 IST