गुहागर : शहरातील शिवराम गृह निर्माण संस्थेच्या शिवराम प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावरील सदनिकेत शिक्षक पतपेढीने विनापरवाना बदल केले आहेत. याप्रकरणी इमारतीमधील रहिवाशांनी गुहागर नगरपंचायतीकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता, त्यांना दिशाभूल करणारी माहिती पुरविली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची तड लावण्यासाठी येथील रहिवाशांनी कंबर कसली असून, त्यांनी आता माहिती आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे अपिल केले आहे. शिवराम प्लाझा इमारतीच्या तळमजल्याच्या निवासी सदनिकेत थाटण्यात आलेल्या शिक्षक पतपेढीच्या कार्यालयात सदनिकेच्या मूळ भिंती व ढाच्याची तोडफोड करुन सुशोभिकरण करण्यात आले. मात्र, या तोडफोडीमुळे इमारतीतील वरच्या मजल्यावरील सदनिकांच्या भिंतीना तडे गेल्याने इमारतीला धोका निर्माण झाला. या प्रकारच्या तोडफोडीसाठी गृहनिर्माण संस्थेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. इमारतीतील रहिवाशांनी नगर पंचायतीकडे न्यायाची मागणी केली. शिक्षक पतपेढीने भिंती तोडण्यासाठी व नवीन भिंती बांधण्यासाठी परवानगी घेतली होती का? असल्यास त्याबाबतची प्रत मिळावी, अशी माहिती मागवली होती. मात्र, दि. २१ फेब्रुवारी २0१४ रोजी केलेल्या अर्जावर माहिती अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती देण्यात आली. त्यावर गृहनिर्माण संस्थेने दि. १५ मार्च २०१४ रोजी पुन्हा माहिती अधिकारात माहिती मागवली. यावर नगरपंचायतीकडून दि. ११ एप्रिल रोजी कोणतीही माहिती न देता तडक सुनावणी लावली. गृहनिर्माण संस्थेने यानंतर माहिती अधिकाऱ्यांकडे अपिल केले. त्यानंतरही योग्य माहिती प्राप्त होत नसल्याने व नगरपंचायत प्रशासनाकडून आपली दिशाभूल होत आहे, अशी येथील रहिवाशांची भावना झाली आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांच्यावतीने शशिकांत पांडुरंग दाते यांनी माहिती आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे अपील करुन दाद मागितली आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून या प्रकरणी होत असलेल्या दिरंगाईबाबत रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
शिक्षक पतपेढीचे सुशोभिकरण वादात
By admin | Updated: June 27, 2014 01:11 IST