लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचे संकट गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. त्यातच आता दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्यांना मेटाकुटीस आणले आहे. त्यातच आता स्वयंपाकाची चव वाढविणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांनाही महागाईचा फटका बसला असल्याने त्यांच्याही दरात भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींच्या हातची चव बिघडण्याची वेळ आली आहे.
दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढू लागला आहे. कोरोनाच्या काळात सर्वत्र बंदीचे सावट आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. नोकऱ्या सुटल्या आहेत. त्यामुळे कसे जगावे, हा प्रश्न आ वासून उभा असतानाच आता इंधन दरवाढीने सामान्य जनता जेरीस आली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका सर्व वस्तूंच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
स्वयंपाकघरातील पदार्थांच्या चवीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थांच्या दरावरही याचा परिणाम झाला असून त्यांचेही दर वाढले आहेत. काहींचे मात्र कमी झाले आहेत.
महागाई पाठ साेडेना
कोरोनाच्या काळात सामान्य जनता आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच पेट्रोल, डिझेल यांचे दर चढत आहेत. घरगुती गॅसही महागला आहे. महागाईचा फटका जनतेला बसत आहे. भाजीपाला, कडधान्ये याबरोबरच आता मसाल्याचे पदार्थही महागले आहेत.
- रेखा नामजोशी, रत्नागिरी
कोरोनाचे सावट गेल्या दीड वर्षापासून अख्ख्या जगावर आहे. यातून सामान्य नागरिक या संकटाचा सामना करत जगत असतानाच ऐन कोरोना काळात मंदीच्या सावटाबरोबरच महागाईचा भस्मासुर वाढू लागला आहे. महागाई कोरोना संकटातही पाठ सोडत नाही. अन्य पदार्थांच्या दराबरोबरच आता मसाल्याचे दरही वाढले आहे.
-आरती साळुंखे, देवरूख
म्हणून वाढले मसाल्याचे दर
महागाईमुळे सर्वच पदार्थांचे दर वाढले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल - डिझेल यांचे दर वाढू लागल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्याचा परिणाम मसाल्याच्या दरावर झाला असून त्यांचेही दर वाढले आहेत.
- जयू पाखरे, व्यापारी, पाल
पेट्रोल, डिझेल आदी इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून वाहतुकीचे दरही वाढले आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा परिणाम वस्तूंच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळेच मसाल्याचे पदार्थही आता महाग होऊ लागले आहेत.