खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कळंबणी येथे गोव्याच्या दिशेने रसायन घेऊन जाणाऱ्या टँकरने अचानक पेट घेतल्याने हाहाकार उडाला हाेता. मात्र, टँकरचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना महालक्ष्मी हाॅटेलसमाेर शनिवारी, दि. २१ ऑगस्ट राेजी रात्री ९.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर टँकरचालक व क्लीनरने प्रसंगावधान दाखवून टँकरमधून उडी मारून पळ काढला. त्यामुळे जीवितहानी टळली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चालक विनयकुमार वर्मा (रा. सुल्तानपूर, उत्तरप्रदेश) हा क्लीनर मोनू कुमार वर्मा (रा. सुल्तानपूर, उत्तरप्रदेश) याच्यासहित गुजरात राज्यातील हाजिरा येथून टँकर (एमएच ०४, एचआर ५६८५)मधून कार पेंट थिनर हे रसायन घेऊन गोव्याला जात हाेता. कळंबणीदरम्यान टँकर आला असता टँकरच्या ब्रेक लायनरजवळ अचानक आग लागली आणि मागील चार चाकांनी पेट घेतला. टँकरला आग लागल्याचे कळताच चालकाने गाडी तेथेच थांबविली. या घटनेची माहिती खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला मिळताच फायरमन श्याम देवळेकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत बॅरिकेटिंग लावून व इतर आवश्यक त्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा अधिक तपास खेड पाेलीस करीत आहेत.