चिपळूण : शहरातील भोगाळे परिसरात अलीकडेच घडलेल्या खळबळजनक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा अवघ्या तीन दिवसांत शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावाणाऱ्या चिपळूण पोलीस स्थानकाच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने शुक्रवारी रावतळे परिसरात घडलेल्या सोनसाखळी चोरीप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
तीन दिवसांपूर्वी रावतळे येथे गजबजलेल्या रस्त्यावर सोनसाखळी चोरीचे प्रकरण घडले होते. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यानी स्वयंपाक काम करण्यासाठी जात आसलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना ओरबाडून पलायन केले होते. या चोरांचा मागमूसही लागणे शक्य नव्हते; परंतु तक्रार दाखल झाल्यापासून केवळ तीन दिवसांत अथकपणे तपास करून संतोष शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचूकपणे आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
काही दिवसांपूर्वी शहरात मार्कंडी, खेंड, काविळतळी, खेर्डी, गुहागर बायपास रोड या ठिकाणी घडलेली सोनसाखळी चोरीची पाचही प्रकरणे या पथकाने उघडकीस आणून एका सराईत साखळी चोराला पकडले होते. ही सारी प्रकरणे एकाच गुन्हेगाराची होती. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या या संशयित आरोपीकडून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी आणि सहायक पोलीस निरीक्षक समद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या या पथकामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संतोष शिंदे, आशिष भालेकर, आदिती जाधव, प्रमोद कदम आदींचा समावेश आहे.