लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महाराष्ट्रात विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत असलेली विकास सहयोग प्रतिष्ठान संस्था आणि सांगोला (सोलापूर) येथील आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या पुढाकाराने चिपळूण आणि खेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांचे ड्रोन प्रणालीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. अचूक सर्वेक्षण प्रणाली वापरण्यात आली आहे.
तालुक्यातील चिपळूण बाजारपेठ आणि आजुबाजूचा परिसर, खेर्डी, दळवटणे, कळंबस्ते, वालोपे, पेढे, तिवरे, आकले, कादवड, तिवडी, दादर आणि खेड तालुक्यातील पोसरे खुर्द, चोरवणे या गावांतील महापुराने झालेल्या नुकसानीची या ड्रोन प्रणालीद्वारे पाहणी करण्यात आली. यामध्ये काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसल्याने शेतीमध्ये आलेला गाळ, डोंगराला पडलेल्या भेगा, दरडी कोसळून झालेले भूस्खलन याचे हवाई मार्गाने अचूक सर्वेक्षण करण्यात आले. सांगोला येथील आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेने याकामी तज्ज्ञ व्यक्तींच्या सहभागासाठी मोठा पुढाकार घेतला. ४ दिवस चाललेल्या या सर्वेक्षण कामामध्ये स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि गावातील प्रभावी व्यक्ती यांचे महापुरातील अनुभव, सूचना, प्रतिक्रिया, निरीक्षणे इत्यादी बाबतच्या नोंदी टिपण्यात आल्या आहेत.
शासनाकडून अपेक्षित असलेल्या अपेक्षा याबद्दल ग्रामस्थांनी आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त केल्या. या सर्वेक्षण कार्यक्रमाचे स्थानिक नियोजन विकास सहयोग प्रतिष्ठानचे विभागीय समन्वयक विजय कदम, प्रकल्प समन्वयक ललेश कदम, वैभव कदम, श्रीराम बेलवलकर, सांगोला (सोलापूर) येथील आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेच्या कल्पना मोहिते, ड्रोनतज्ज्ञ सुशांत मधाळे, ड्रोन पायलट बिकास शामल, धैर्यशील जंगम आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.