पावस : रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथे शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
शिवमुद्रा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सखाराम तरळ, उपाध्यक्ष मारुती रामचंद्र फुटक, खजिनदार रमेश महादेव कोलगे, सचिव अभिषेक बाळकृष्ण बनकर व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित हाेते. गावामध्ये सामाजिक कार्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या स्थापनेनिमित्त दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान चांदोरमधील आशा स्वयंसेविका अश्विनी अविनाश कुळ्ये व प्रियांका पांडुरंग बनकर यांचा कोविडयोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपशिक्षिका स्वरा रमेश फटकरे व विजय गणू कोलगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच मंडळातर्फे २२ तारखेला रत्नागिरीतील लायन्स आय हॉस्पिटल आणि शिवमुद्रा प्रतिष्ठान चांदोर यांच्यावतीने मोफत नेत्र व मोतिबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचा गरजू ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.