खेड : तालुक्यातील मोरवंडे - बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघातर्फे दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह तृतीय वर्ष वाणिज्य संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागात प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. इटली येथे पीएच.डी.साठी निवड झालेल्या नुपूर खातू यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कुणाला हरवंदे यांनी, भविष्यात संस्था विद्यार्थ्यांना कसे सहकार्य करेल हे यावेळी स्पष्ट केले. नुपूर खातू यांनी प्रशालेतील प्रवास उलगडला. संस्था सरचिटणीस प्रकाश गुजराथी यांनी संस्थेच्या भविष्यकालीन योजना सांगून त्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष माधव पेठे, ज्ञानदीप महाविद्यालय चेअरमन दीपक लढ्ढा यांच्यासह संस्था पदाधिकारी व माजी विद्यार्थी संघाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी किरण दरेकर यांनी केले, तर आभार दीपक साबळे यांनी मानले.