खेड : खेड भरणे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवाजीनगर परिसरातील पथदीप बंद असल्याने, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा मार्ग सतत वर्दळीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पथदीप बंदच आहेत. याबाबत नगरपरिषदेकडून काहीही प्रयत्न होत नाहीत. याबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आयकरतर्फे वृक्षारोपण
देवरुख : देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आयकर विभागाच्या वतीने येथील वेदपाठशाळा ट्रस्टचे विश्वस्त अमित साने, आयकर विभागाचे अधिकारी अजयकुमार मीना व अन्य अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
बेरोजगार संघटना
देवरुख : सुशिक्षित बेरोजगार जिल्हा कार्यकारिणीची संगमेश्वर तालुकास्तरीय बैठक धामणी येथे झाली. या बैठकीच्या वेळी संगमेश्वर तालुका नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष प्रद्युम्न माने यांची निवड करण्यात आली, तर तालुका संघटक सागर मांगले, तालुका समन्वयक मयूर भिंगार्डे यांची निवड झाली.
एसटीला पसंती
देवरुख : गणेशोत्सवासाठी तालुक्याच्या विविध भागांत आलेल्या मुंबईकर भक्तांकडून परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाला पसंती दिली जात आहे. गेल्या पाच दिवसांत देवरुख आगारातील १२० गाड्या सोडण्यात आल्या. यामधून ५,२०० प्रवाशांनी मुंबईला परतीचा प्रवास केला.
अवजड वाहतूक बंदच
साखरपा : रत्नागिरी पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग असलेल्या आंबा घाटातून दीड महिन्यांपासून अवजड वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्राकडून होणारा संपर्क थांबला आहे. त्यामुळे या घाटाची लवकरात लवकर दुरुस्ती करून अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्याची मागणी होत आहे.