जैतापूर : नाटे येथील नाटेश्वर मंदिरात पाषाण शिल्प सापडले आहेत. येथील एका पुजाऱ्याकडे अंगणाचे काम सुरु असताना हे शिल्प सापडले. मंदिराशेजारी राहणाऱ्या या मंदिराचे पुजारी गजानन नारायण लिंगायत यांनी आपल्या घरासमोर असलेले अंगण मातीचा भर टाकून व्यवस्थित करण्याचे ठरवले. काम सुरु असतानाच त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर काळ्या रंगाचा पाषाण त्यांना अडचणीचा वाटू लागला. तो काढण्यासाठी खोदकाम करताना तळाकडच्या भागाकडून सपाट वाटत होता. म्हणून त्यांनी त्याचा वापर पायरी म्हणून करण्याचे ठरवले. सात ते आठ मजुरांनी तो फिरवून सपाट बाजू कितपत आहे, याची पाहणी केली असता चमत्कार दिसला. या काळ्या पाषाणावर पुरातन देवतांची चित्र कोरलेली असल्याचे अस्पष्ट दिसू लागले. लिंगायत यांनी तत्काळ स्वच्छ पाण्याने हा पाषाण धुवून स्वच्छ केला. गेल्या काही महिन्यात कातळ शिल्प सापडत असून, त्याच्यावर पुरातत्व विभाग अभ्यास करीत आहे. त्यानंतर काही दिवसांनी नाटे येथील मंदिरात ही शिल्प आढळली आहेत. (वार्ताहर)
नाटेश्वर मंदिराशेजारी सापडले पाषाण शिल्प
By admin | Updated: November 1, 2015 22:51 IST