जागेची मागणी
रत्नागिरी : शहरातील मोकाट जनावरांना पकडून नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात येते. कोंडवाड्यात जनावरांचे संगोपन योग्य पद्धतीने केले जात नसल्याची तक्रारी विश्व हिंदू परिषद व अन्य प्राणीमित्र संघटनेने केल्या आहेत. नगरपरिषदेकडे सुसज्ज जागा उपलब्ध नाही. त्यामुळे कोंडवाड्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी आरोग्य सभापती निमेश नायर यांनी केली आहे.
विशेष गाड्यांना मुदतवाढ
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विशेष स्पेशल गाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांसाठी मांडवी एक्स्प्रेस व कोकण कन्या एक्स्प्रेसला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन्ही एक्स्प्रेस नियमित धावणार आहेत. २२ डब्यांच्या दोन्ही स्पेशल गाड्यांतून प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
चित्रकला स्पर्धा
रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे पीस पोस्टर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ वयोगटासाठी ही स्पर्धा खुली करण्यात आली आहे. २६ सप्टेंबरपर्यंत स्पर्धेत स्पर्धकांना चित्र सादर करावयाचे आहे. वुई आर ऑल कंटेस्टंट हा विषय ठेवण्यात आला आहे.
निकम यांचे यश
खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंचच्या जिल्हा पालघर जिल्हा शाखेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत गणेश निकम यांच्या कवितेने प्रथम क्रमांक पटकावला. अविनाश ठाकूर, सुनीता कपाळे, वर्षा वराडे, सुचित्रा कुंचमवार यांनी स्पर्धेत यश संपादन केले आहे.
मोफत काढा वाटप
दापोली : उत्तर रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे हर्बल टी व कोरोनाचा काढा यांचे मोफत वाटप दिनांक २० सप्टेंबर रोजी जालगाव येथील समर्थ भाजी मार्ट, मंगलमूर्ती निवास येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. दोन्ही आरोग्य काढे प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहेत. कोरोना परिस्थिती लक्षात घेता मोफत काढे वाटप होणार आहे.
रौप्यमहोत्सव साजरा
मंडणगड : तालुक्यातील पेवे-शिगवणवाडी येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळाचा रौप्यमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष गणेश शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते शिगवणवाडी सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.
पतसंस्थेची सभा
राजापूर : तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित राजापूरच्या २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने ही सभा होणार असून चेअरमन प्रकाश मांडवकर सभेचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. दुपारी अडीच वाजता सभा होणार आहे.
११२ क्रमांक सुरू होणार
रत्नागिरी : जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थितीत व्यक्ती अडकल्यास काळजी न करता पोलीस पथक मदतीला धावत येणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तींनी मोबाईलवरून ११२ हा आपत्कालीन क्रमांक डायल करायचा आहे. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.