लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेतर्फे १८, १६, १४, १२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या निवड बुध्दिबळ स्पर्धा यावर्षी ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. कोरोनामुळे गतवर्षी सर्व वयोगटातील व खुल्या निवड बुध्दिबळ स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यावर्षीही कोरोनामुळे प्रत्यक्ष स्पर्धा घेणे शक्य नसल्यामुळेच जागतिक बुध्दिबळ संघटनेने या विविध वयोगटातील जागतिक अजिंक्यपद बुध्दिबळ स्पर्धा जुलैमध्ये ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे निश्चित केले आहे.
अखिल भारतीय बुध्दिबळ संघटनेने निवड स्पर्धा १० जूनपासून घेण्याचे निश्चित केले असून, महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनाही १८, १६, १४, १२ व १० वर्षाखालील मुला-मुलींच्या ऑनलाईन निवड बुध्दिबळ स्पर्धा दि. ३ जूनपासून घेण्यात येणार आहे. या पाच गटांतील बुध्दिबळ स्पर्धा मुले व मुलींच्या स्वतंत्र गटात स्पर्धा घेण्यात येणार असून, एकूण दहा गटांत या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा स्विस लीगच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्या ऑनलाईनने ‘टॉर्नलो’ या संकेतस्थळावर होणार आहेत.
प्रत्येक गटातील स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. दररोज तीन फेऱ्यांप्रमाणे एकूण नऊ फेऱ्या स्विस् लीग पध्दतीने होणार आहेत. ‘टॉर्नलो’ हे ऑनलाईन बुध्दिबळ खेळण्याचे नवीन व्यासपीठ असल्यामुळे प्रत्येक गटात सुरुवातीला ट्रायल राऊंडची एक फेरी होणार आहे.
प्रथम अठरा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा ३ ते ५ जून, सोळा वर्षाखालील मुलांची व मुलींची स्पर्धा ६ ते ८ जून, चौदा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा ९ ते ११ जून, बारा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा १२ ते १४ जून, तर दहा वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा १५ ते १७ जूनअखेर होणार आहेत. प्रत्येक गटासाठी रोखीची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
अधिक माहितीसाठी भरत चौगुले (कोल्हापूर), मंगेश गंभीरे (नाशिक), प्रवीण ठाकरे (जळगाव), विलास म्हात्रे (अलिबाग), सच्चिदानंद सोमण (नागपूर), अंकुश रक्ताडे (बुलढाणा), प्रकाश भिलारे (मुंबई), सलील घाटे (ठाणे), सुमूख गायकवाड (सोलापूर), मनीष मारूलकर (कोल्हापूर), चंद्रकांत वळवडे (सांगली), हेमेंद्र पटेल (औरंगाबाद) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष सिध्दार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी केले आहे.