चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरतर्फे दि. १० ते १३ जानेवारी दरम्यान चिपळूण येथे राज्यस्तरीय शतायु ग्रंथालयाचे संमेलन घेतले जाणार आहे. ग्रंथालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त हे संमेलन होत आहे. ग्रंथालयाच्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात शतक व त्याहून अधिक वर्षे झालेली १००पेक्षा अधिक ग्रंथालये आहेत. १८१८ नंतर देशात इंग्रजांच्या राजसत्तेचा अंमल झाला. सत्तेबरोबरच इंग्रजी भाषाही देशात आली. नवविचारांचे वारे त्यानिमित्ताने वाहू लागले आणि वाचनाची आवड, गोडी निर्माण झाली व त्यातूनच ग्रंथालय सुरु झाले. महाराष्ट्रातील पहिले ग्रंथालय १८२८ मध्ये लोकमान्य टिळक यांचे वडील गंगाधरपंत टिळक यांनी रत्नागिरी येथे सुरु केले. लोकहितवादीनी १८४८मध्ये पुणे येथे नगर वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. चिपळूण येथे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर १८६४मध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी म्हणून सुरु झाली. महाराष्ट्रातील अशा सर्व ग्रंथालयांची माहिती संमेलनाच्या निमित्ताने संकलित करुन एक अभ्यासपूर्ण स्मरणिकाही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या संमेलनाबरोबरच अन्य उपक्रम आयोजित करण्याचे संचालक मंडळाने निश्चित केले आहे. संचालक मधुसुदन केतकर, सुनील बेडेकर, प्रकाश गांगण, वसुंधरा पाटील, अरुण इंगवले, प्रकाश काणे, विनायक ओक, सुमेध करमरकर यांनी संमेलनासंदर्भात झालेल्या चर्चेत भाग घेऊन संमेलन यशस्वीतेसाठी सर्व वाचनप्रेमींचे सहकार्य घेऊन एक सभा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या उपक्रमाला सर्व नागरिक, वाचकप्रेमी नेहमीच सहकार्य करीत असतात. हे जानेवारी २०१३ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरुन स्पष्ट झाले आहे. (वार्ताहर)
चिपळुणात १०पासून राज्य संमेलन
By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST