मेहरून नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अनलाॅकनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. लाॅकडाऊनमध्ये बंद असलेल्या शटल फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रात्रवस्ती व लांब पल्ल्याच्या बहुतांश गाड्या सुरू करण्यात आल्या असून उर्वरित गाड्या गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात रात्रवस्तीच्या २४० फेऱ्या सुरू होत्या त्यापैकी १७० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विभागात ४० शटल फेऱ्या सुरू होत्या, सर्व फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय लांब पल्ल्याच्या १९० पैकी ११० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरित फेऱ्या प्रवासी प्रतिसाद पाहून गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
रेल्वेलाही प्रतिसाद
कोकण रेल्वेमार्गावर १२० रेल्वे गाड्या सुरू आहेत. रेल्वेने कोरोना चाचणीचे नियम शिथिल केले असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. लाॅकडाऊनपूर्वी लांब पल्ल्याच्या १९० एस.टी.च्या फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी ११० फेऱ्या सुरू केल्या आहेत. पुणे, मुंबई, सोलापूर, अर्नाळा, अक्कलकोट मार्गावर एस.टी. फेऱ्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
- खेड- चिपळूण
- खेड-दापोली
- देवरूख-रत्नागिरी
- रत्नागिरी -लांजा
- लांजा-राजापूर
- चिपळूण-रत्नागिरी
- रत्नागिरी-संगमेश्वर
- चिपळूण-पोफळी
- दापोली-हर्णे
रात्रवस्तीला मागणी
लाॅकडाऊनपूर्वी जिल्ह्यात रात्रवस्तीच्या २४० फेऱ्या सुरू होत्या. ग्रामीण भागातून रात्रवस्तीच्या फेऱ्यांना वाढती मागणी असल्याने १७० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित ७० रात्रवस्तीच्या फेऱ्या लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत चालक-वाहकांसाठी राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. मात्र, उर्वरित अन्य मार्गावरील बहुतांश फेऱ्या मात्र सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. गणेशोत्सव जवळ आला असून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परतीसाठी ६६० गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक.