तन्मय दाते
रत्नागिरी : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी पाेलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे़ तरीही अनेकजण दुपारच्या वेळेत आडमार्गाचा वापर करून बाहेर पडत असल्याचे प्रकार घडत आहेत़ या वाहनचालकांना चाप बसण्यासाठी पाेलिसांनी जिल्हाभरात दुपारच्या वेळेत आडमार्गावर पाेलीस तैनात करून तपासणी केली़ या कारवाईत तब्बल ४०० जणांवर कारवाई करण्यात आली़
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे़ या काळात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर वचक राहावा, यासाठी पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. याठिकाणी दररोज जाणारी प्रत्येक गाडी तपासूनच पाठवली जाते. तरीही, काही नागरिक पोलिसांची नजर चुकवून आडमार्गाने पळ काढतात़ विशेषत: दुपारच्या वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक असते़ अशा नागरिकांना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ‘सरप्राइज’ नाकाबंदी मोहीम हाती घेतली हाेती़ ही माेहीम शनिवारी दुपारी ३ ते ३.३० यावेळेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविण्यात आली.
अचानकपणे नाकाबंदीची ठिकाणे बदलल्याने गाफील असलेले नागरिक पोलिसांच्या तावडीत सापडले. ही कारवाई कारवांचीवाडी, निवळी, देवरूख, चिपळूण बाजारपेठ आणि अन्य ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत विनामास्क फिरणाऱ्या १२७, मोटार वाहन कायदा भंग केल्याप्रकरणी २५० आणि अन्य प्रकारांमध्ये २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले़ या तपासणीचा विनाकारण फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला असून, दाेन दिवस विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या राेडावली हाेती़
-----------------------
कारवाई करून लोकांकडून दंड वसूल करणे, हा यामागचा उद्देश नाही़ झपाट्याने पसरत असलेला कोरोना लवकरात लवकर आटोक्यात यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ काेराेनाचा संसर्ग वाढत असूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे़ हे त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही धाेकादायक आहे़ त्यामुळे ही माेहीम हाती घेण्यात आली हाेती़ काेराेनाला राेखण्यासाठी अशा विविध याेजना अचानकपणे राबवण्यात येणार आहेत़
- डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पाेलीस अधीक्षक, रत्नागिरी
-------------------------
रत्नागिरी येथील कारवांचीवाडी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व परिविक्षाधीन अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीचालकांची तपासणी केली़