देवरुख : रस्त्यावर पडलेले खड्डे आपल्याला माहिती आहेत पण खड्ड्यांत असलेला पूल कधी पाहिला आहे का, नसेल तर संगमेश्वरातील ब्रिटिशकालीन सोनवी पूल पाहावा. रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता असे आपण म्हणतो तसे आता पुलावर खड्डे की खड्ड्यातला पूल असे म्हणण्याची वेळ संगमेश्वरवासीयांवर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सध्या ठिकठिकाणी खड्डे तर आहेतच. मात्र, याच राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक असलेल्या या सोनवी पुलाशेजारी नवा पूल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, जुन्या पुलावरून अजूनही वाहतूक सुरूच आहे. पण या पुलावरील खड्ड्यांकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. ना ठेकेदार लक्ष देत ना राष्ट्रीय महामार्ग विभाग त्यामुळे वाहनधारकांचे तर कंबरडे अक्षरशः मोडले आहे. तर पादचारीही हतबल झाले आहेत. या पुलावरून जाताना चिखलाचीच आंघोळ होत आहे.
सोनवी पुलाप्रमाणेच शास्त्री नदीच्या पुलावरही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच महामार्गवर अनेक ठिकाणी अगदी फूट दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेतच. खरेतर महामार्ग विभागाने गणेशोत्सवापूर्वी तरी हे खड्डे भरायला हवे होते. मात्र, तसे काहीच झालेले नसल्याने गणेशभक्तांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागला.
110921\0612img-20210911-wa0053.jpg
सोनवी पुलावर पडलेले खड्डे