सातारा : ऐन थंडीच्या कडाक्यात वैफल्यग्रस्त अवस्थेत जिल्हा रुग्णालय परिसरात भटकत राहणाऱ्या ‘तिच्या’ अभागीपणाची व्यथा शनिवारी भाऊबीजेदिवशी ‘लोकमत’नं मांडली. ‘माझा भाऊ खंबीर आहे, नकोय तुमची मदत’ असे स्वाभिमानाने सांगणाऱ्या ‘तिच्या’ भावाच्या शोधासाठी आता सामाजिक संघटना सरसावल्या आहेत. दरम्यान, रविवारी त्या निराधार महिलेची उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवानगी केली आहे.जिल्हा रुग्णालय परिसरात ‘ती’ कठड्यांच्या आडोशाला बसल्याचे अनेकांनी पाहिले असेल. थंडी वाढल्यामुळे भिंतीला चिकटून रात्री तिथेच झोपी जात असल्यामुळे काही नागरिकांनी तिला महिला सुधारगृहात पाठविण्याचा निर्णय घेतला; पण ‘ती’ भलतीच स्वाभिमानी. ‘माझा भाऊ खंबीर आहे मला मदत करायला... मला नकोय तुमची मदत’ असे म्हणून तिने मदत नाकारली. रविवारी जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार व भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक शिवाजी खुडे हे सकाळी साडेअकरा वाजता त्या महिलेला पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिला ब्लँकेट व साडी दिली. खायला दिले. पण उभे राहता येत नसल्यामुळे तिने दवाखान्यात गेल्यावरच साडी नेसेन, असे सांगितले. नातेवाइकांबाबत चौकशी केली असता, तिच्याकडून असंबध उत्तरे येत होती. पवार आणि खुडे यांनी जिल्हा रुग्णालयात त्या निराधार महिलेची परिस्थिती सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला स्ट्रेचरवर बसवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शारीरिक वेदनेने ती विव्हळत होती. असंबंध काही तरी बडबडत होती. (प्रतिनिधी) तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढची दिशारुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला अॅडमिट करून घेतले आहे. डॉ. अरुंधती कदम यांनी त्या महिलेच्या तब्येतीबाबत चौकशी केली. सर्व तपासण्या करून त्याचा अहवाल सोमवारी दिला जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अहवाल मिळाल्यानंतरच त्या महिलेला कुठे ठेवायचे, याबाबत निर्णय होणार आहे.रुग्णालय परिसरात बघ्यांची गर्दीसकाळी भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक शिवाजी खुडे आणि सिद्धी पवार यांनी त्या महिलेची विचारपूस केली. ती कधी देवाची गाणी म्हणायची तर कधी पोटात खूप दुखतंय, मला जास्त बोलता येत नाही असे बडबडायची. जवळपास दोन ते अडीच तास ते महिलेची विचारपूस करत होते. यावेळी रुग्णालय परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
भावाच्या शोधासाठी सामाजिक संघटना सरसावल्या
By admin | Updated: November 15, 2015 23:49 IST