रत्नागिरी : जिल्ह्यातील ४६१ पैकी ३०७ ग्रामपंचायतींवर भगवा फडकावीत शिवसेनेने जिल्ह्यावरील आपले राजकीय वर्चस्व कायम ठेवले आहे. ४६१ पैकी १३२ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस दुसऱ्या, तर विविधरंगी गाव पॅनेल्स तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. भाजपने प्रथमच स्वतंत्र निवडणूक लढवीत रत्नागिरी, दापोली आणि गुहागरमध्ये काही ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप एकत्र होते. विधानसभा निवडणुकीत ही युती तुटली. ग्रामपंचायतींची ही निवडणूक दोघांनी स्वबळावर लढविली. त्यामुळे प्रत्येक पक्ष किती पाण्यात आहे, याची चाचणीही या निवडणुकीने पुन्हा एकदा झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील ५० पैकी ४१ ग्रामपंचायती सेनेकडे आल्याची माहिती तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गतवेळेपेक्षा तालुक्यात यावेळी चार ग्रामपंचायती सेनेला अधिक मिळाल्या आहेत. त्याचवेळी सेनेची सत्ता असलेल्या चाफे, नांदिवडे व सांडेलावगण या ग्रामपंचायती सेनेकडून भाजपने हिसकावल्या आहेत. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींवर भाजपला सत्तेची संधी मिळाल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी दिली. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आलेल्या संगमेश्वर खाडीपट्टा भागातील सहा ग्रामपंचायतीही शिवसेनेने जिंकल्या आहेत. गुहागर तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीत १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने बाजी मारली आहे. सहा ग्रामपंचायतींवर सेना-भाजपने, तर गावविकास पॅनेल्सनी तीन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी मंत्री व सध्याचे आमदार भास्कर जाधव यांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने या तालुक्यात आपली ताकद दाखविली आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचेच वर्चस्व
By admin | Updated: April 24, 2015 01:23 IST