खेड : तालुक्यातील संवेदनशील विभाग म्हणून गणल्या गेलेल्या भरणे जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक २८ जानेवारीला निश्चित झाली आहे. शिवसेनेतील गटतट संपुष्टात आल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. खेड तालुक्यात असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कांगणे, खासदार अनंत गीते, रामदास कदम यांचे गट एकत्र येणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. आता या पोटनिवडणुकीत ही गटबाजी संपते का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.या गटाच्या पोटनिवडणुकीकरिता शिवसेनेच्या वतीने कळंबणी येथील महिपत पाटणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँगेसच्यावतीने पांडुरंग पाष्टे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तुलनात्मकदृष्ट्या शिवसेनेचे पाटणे यांचा दबदबा विभागावर राहणार असल्याचे बोलले जात आहे़ दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात भरले आहेत. यावेळी शिवसेनेचे शंकर कांगणे, शशिकांत चव्हाण, राजा बेलोसे आणि विश्वास दळवी हे एकत्र आल्याने या विभागावर पुन्हा शिवसेनेचा वरचष्मा राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे़ सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर गेली ५ वर्षे कदम राजकीय वीजनवासात गेले होते. त्यानंतर वर्षभरातच माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर तालुक्यातील शिवसेनेची धुरा आली. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आणि पोटनिवडणुकादरम्यान तालुक्यातील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमध्येही गटतटाचे राजकारण पाहावयास मिळाले़ खेड नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला अगदी काठावर बहुमत मिळवता आले़ अनेक बाबतीत पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेदाची दरी रूंदावत चालली होती़ याचकाळात दापोली विधानसभेचे तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी आणि जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांच्यात मतभेद निर्माण झाले. यानंतर संजय कदम भरणे जिल्हा परिषद गटातून निवडणुकीस उभे राहिले. यावेळी शिवसेनेचे शशिकांत चव्हाण या निवडणुक रिंगणात होते. मात्र, भरणे विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही संजय कदम निवडून आले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये संजय कदम, सूर्यकांत दळवी यांच्याविरोधात उभे राहून निवडून आले. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय कदम यांना मदत केल्यानेच कदम निवडून आल्याची चर्चा देखील सुरू झाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत रामदास कदमांनी दुर्लक्ष केल्याचे पाहावयास मिळाले, तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे आणि माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हे या निवडणुकीपासून अलिप्त राहिले. एकूणच परिस्थिती शिवसेनेचे खच्चीकरण करण्यास पोषक ठरल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. यामुळे भरणे जिल्हा परिषद गट शिवसेनेच्या हातून गेला असेच वाटत होते़ मात्र, संजय कदम आमदार झाल्याने भरणे जिल्हा परिषद सदस्यपदाची जागा रिक्त झाली. शिवसेनेच्या वतीने महीपत पाटणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला़ यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शंकर कांगणे आणि विश्वास दळवी यांच्यासह शांताराम म्हैसकर आणि उधळे येथील बशीर हजवानी उपस्थित होत. राष्ट्रवादीने उधळे येथील पांडुरंग पाष्टे यांना उमेदवारी दिली आहे. संजय कदम विरूध्द शिवसेना अशीच ही निवडणूक आहे. ती चुरशीची आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेची व्यूहरचना जिल्हा परिषद भरणे गटातील पोटनिवडणुकीत रंगत भरली असून, यावेळी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकर कांगणे, राजा बेलोसे आदी मंडळी एकत्र आल्याने ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीसाठी आव्हान ठरली आहे. यापूर्वी या भागात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला होता. चव्हाण यांच्या हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आहे. संवेदनशील भरणे जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचे लक्ष केंद्रीत. चव्हाण, राजा बेलोसे, विश्वास दळवी, कांगणे एकत्र आल्याने पुन्हा वरचष्मा. रामदास कदम मंत्री झाल्यानंतर गटात पुन्हा उत्साह. गट-तट संपणार असल्याने कार्यकर्ते पुन्हा जोशात. भरणे गटात होणाऱ्या लढतीवर लक्ष. संजय कदम आमदार झाल्याने भरणे गटात होतेय पोटनिवडणूक.सर्व गट एकत्र आल्याने उत्साह.
शिवसेनेत गटतट संपुष्टात?
By admin | Updated: January 15, 2015 23:28 IST