आवाशी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेडमध्ये महापुराचा फटका बसल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हजारो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना राज्यभरातील सर्वच स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी चिपळूण व खेर्डी परिसरातील ब्युटीशियनचा व्यवसाय करणाऱ्या महिलाही मागे राहिल्या नाहीत.
महापुराचा चिपळूण शहरासह खेर्डी, कळंबस्ते, दळवटणे या गावांना माेठ्या प्रमाणात फटका बसला. तसेच खेड तालुक्यातील पोसरे गावची बौध्दवाडी दरडीखाली गाडली गेली. अनेकजण बेघर झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. पूरबाधित झालेल्या कुटुंबीयांना अनेकांनी मदतीचा हात दिला. अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला. या मदतीच्या कार्यात चिपळूणमधील पूरग्रस्तही सामील झाले हाेते. स्वत:चा व्यवसाय सांभाळत त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. चिपळूण व खेर्डी परिसरात ब्युटीशियनचा व्यवसाय करणाऱ्या काही महिला आपल्या दुकानातील चिखल, माती काढण्याबरोबर समाजाप्रति असलेली भावना जपत हाेत्या. या महिलांनी चिपळूण उपनगरसह बाधित गावांमध्ये जाऊन मदतीचा हात देत माणुसकी जपली. यामध्ये मीनल मिलिंद आंब्रे, स्वरा विजय आंब्रे, प्रियांका भोसले, स्वरा सावंत, अनिता पाटील, मनस्वी तपकीर, पूजा सावंत, रत्नागिरी येथील प्रिया वाजे, दर्शन सुर्वे, जितेंद्र चाळके यांचा समावेश आहे. त्यांनी अनेकांना धान्य, भांडी, संसारोपयोगी साहित्याची मदत केली.