रत्नागिरी : रत्नागिरीतील ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाल्याची वृत्ते आली. माहिती घेता तो स्फोट नसून वाहिनीत गळती होती; पण रत्नागिरीसह राज्यात ऑक्सिजन अपुरा पडत असताना गळती होणे हेही योग्य नाही. याबाबत जिल्हा रुग्णालयाने दक्षता घेतली पाहिजे. अशी चूक परत होणार नाही, याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी त्यांनी ही ऑनलाइन पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. तसेच चाचण्या आणि लसीकरणाचाही आढावा सकाळी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेतला असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यात पाच कोरोना रुग्णालये, १३ डी. सी. एच. सी. आणि १४ कोविड सेंटर यांमध्ये एकूण ३०५२ बेड उपलब्ध आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण साडेचार हजार असून त्यापैकी ६८ लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत. रत्नागिरीत नव्याने नगरपालिकेचे रुग्णालय सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. पाच नव्या ऑक्सिजन प्लांटबरोबरच आता १० नव्या रुग्णवाहिकांसाठी आरोग्य विभागाची मंजुरी मिळाली असून दोन कार्डिॲक रुग्णवाहिका खरेदीची प्रक्रियाही पुढच्या आठवड्यात संपेल. त्याचबरोबर २५ व्हेंटिलेटर खरेदीलाही परवानगी घेतल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, ते अत्यावश्यक असेल तरच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिले जाणार आहे. लसीकरणाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, जिल्ह्यात ९० टक्के पोलिसांचे, ९० टक्के महसूल विभागाचे, ९८.५० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे तर ८५ टक्के पंचायत राजमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा आवश्यक तो पुरवठा होत नाही. तोपर्यंत अडचण येणार आहे. येत्या दोन दिवसांत यावर नक्की मार्ग काढू. लसीकरणाचा स्टाॅक आल्यानंतर सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की राहील. लस सर्वांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आघाडी सरकारची आहे, असे ते म्हणाले. सध्या निर्बंधामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आदी कार्यालयांमध्ये पूर्ण क्षमतेने कर्मचारी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कामे प्रलंबित राहत आहेत, त्यावर पर्याय म्हणून ऑनलाइन व्यवस्था करता येईल का, ते पाहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्याचे सामंत यांनी सांगितले.
रुग्ण व नातेवाइकांचा संयम आणि सहकार्याची गरज
सध्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे वेळेवर उपचारासाठी दाखल न होणे, हे आहे. सध्या कम्युनिटी स्प्रेड असल्याचे दिसत असल्याने ही चिंतेची बाब आहे. रुग्णांनी वेळेवर उपचारासाठी दाखल व्हावे.
ॲपेक्स प्रशासन ताब्यात घेणार
ॲपेक्स रुग्णालयाबद्दल रुग्णांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. त्यामुळे हे रुग्णालय आता प्रशासनाच ताब्यात घेईल आणि तिथले डाॅक्टरच ते चालवतील, असे सामंत यांनी सांगितले.
चाचण्यांचा अहवाल उशिरा
कोरोना चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहत असल्याने जिल्हा रुग्णालयात दुसरे १६ लाखांचे मशीन खरेदी करण्यात येणार आहे.