रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जासाठी लागणारे सात-बारा उतारे यापुढे बँकेतच मिळणार आहेत. त्यामुळे सरकारी विलंब व चकरा मारण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार असून, त्यांना तत्काळ कर्ज मिळणे सोपे झाले आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी हा निर्णय जाहीर केला.
प्राथमिक शेती सहकारी संस्थांच्या कर्जदार सभासद शेतकऱ्यांना सात-बारा उताऱ्यांचे वितरण करण्याची सुविधा रत्नागिरी जिल्हा बँकेत उपलब्ध झाली आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी हा या बँकेचा केंद्रबिंदू आहे. बँकेकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाते. कर्ज वितरणावेळी शेतकऱ्यांचा सात- बारा उतारा पाहून पीक-पाणी, कर्जबोजाची नोंद आदी बाबी विचारात घेतल्या जातात. परंतु सात-बारा उतारे मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे बँकेने सर्व शाखांमधून ही सुविधा सुरू केली आहे.
याबाबतीत बँकेच्या संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार जमावबंदी आयुक्त आणि संचालक-भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. शेतकऱ्यांना शाखा पातळीवर डिजिटल स्वाक्षरीत अधिकार अभिलेख, सात-बारा उतारे तसेच नमुना नंबर सहा आदी उतारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रतिउतारा पंधरा रुपये शासनाकडे जमा करावयाचे असून, याकरिता मनुष्यबळ, नेटवर्किंग, संगणक व स्टेशनरीसाठी येणारा सर्व खर्च जिल्हा बँक स्वत:च्या भांडवलातून उचलणार आहे. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले आहे.